लोकप्रिय टीव्ही कपल Gurmeet Choudhary आणि पत्नी Debina Bonnerjee यांना कोरोना विषाणूची लागण; घरीच क्वारंटाइन असल्याची माहिती
Gurmeet Choudhary and Wife Debina Bonnerjee (Photo Credits: Instagram)

सध्या टीव्ही इंडस्ट्रीमध्येही कोरोना व्हायरसने (Coronavirus) हाहाकार माजवलेला दिसून येत आहे. याआधी अनेक टीव्ही सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाल्याची बातमी आली होती. आता अभिनेता गुरमीत चौधरी (Gurmeet Choudhary) आणि त्याची पत्नी देबिना बॅनर्जी (Debina Bonnerjee) यांची कोरोना विषाणूची चाचणी सकारात्मक आल्याचे समजत आहे. गुरमीतने ट्विटरवर एक पोस्ट शेअर करुन स्वत:ला आणि पत्नीला कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती दिली आहे. तसेच ते दोघेही ठीक आहेत व सध्या घरीच क्वारंटाइन असल्याचेही सांगितले आहे. गुरमीतने नुकतेच आपल्या 'द वाइफ’ या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे.

गुरमीत चौधरीने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, ‘आज माझी आणि माझी पत्नी देबिनाची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. देवाच्या कृपेने आम्ही बरे आहोत आणि घरातच क्वारंटाइनमध्ये आहोत. आम्ही आमची पूर्ण काळजी घेत आहेत, तसेच आमच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांना स्वतःची काळजी घेण्याची विनंती आम्ही करतो. आपले प्रेम आणि सपोर्टबद्दल धन्यवाद.’ रामायणात राम आणि सीतेच्या भुमिकेमुळे गुरमीत आणि देबिना लोकप्रिय झाले होते.

वृत्तानुसार, गुरमीत चौधरी आपल्या एका चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करून 17 सप्टेंबर रोजी जयपूरहून परत आला आहे. मुंबई मिररशी झालेल्या संभाषणात गुरमीतने सांगितले होते की, त्याने सर्व खबरदारी घेऊनच चित्रीकरण पूर्ण केले आहे आणि सुरक्षेचीही विशेष काळजी घेतली आहे. तो म्हणाला होता की, 'आमच्या सर्वांची कोरोना विषाणूची चाचणी झाल्यानंतरच आम्ही 16 ऑगस्टला जयपूरला रवाना झालो. तिथे पुन्हा एकदा आमची कोरोनाची टेस्ट झाली. प्रत्येकाची चाचणी नकारात्मक आल्यानंतरच 6 दिवसांनी आम्ही सेटवर गेलो.’ (हेही वाचा: आफताब शिवदासानी ने केली कोरोनावर मात; चाहत्यांसाठी शेअर केला 'हा' अनुभव)

दरम्यान, आतापर्यंत अनेक टीव्ही सेलिब्रिटी कोरोना विषाणू संक्रमित आढळले आहेत. अभिनेत्री प्रिया आहुजा, श्वेता तिवारी, हिमांशी खुराना, राजेश्वरी सचदेव, हिमानी शिवपुरी, श्रेणू पारीख, संजय कौशिक, करम राजपाल, राहुल सुधीर, चांदनी शर्मा, सारा खान आणि इतर अनेक सेलेब्सला कोविडची लागण झाली आहे.