कॉमेडी शो Taarak Mehta Ka Ooltah Chashmah चा नवा विक्रम; पूर्ण केले तब्बल 3300 एपिसोड, 13 वर्षे करत आहे लोकांचे मनोरंजन
Taarak Mehta Ka Ooltah Chashma (PC -Facebook)

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) हा देशातील सर्वात लोकप्रिय शोपैकी एक आहे. हा शो मनोरंजनाच्या बाबतीत टेलिव्हिजनवर राज्य करत आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. एक कौटुंबिक कॉमेडी शो म्हणून याची ख्याती जगभरात आहे. आता या शोने एक महत्वाचा टप्पा पूर्ण केला आहे. नुकतेच या शोने 3300 एपिसोड पूर्ण केले आहेत. इतके जास्त एपिसोड्स पूर्ण करणारा हा कदाचित जगातील पहिला शो असेल. या खास प्रसंगी, शोचे निर्माते असित कुमार मोदी यांनी प्रेक्षकांचे प्रेम आणि सतत पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत. तसेच चाहत्यांना असेच हसत ठेवणार असल्याचे आश्वासन दिले.

असित कुमार मोदी म्हणाले, 'तारक मेहता का उल्टा चष्मा' हा केवळ शो नाही; ती एक भावना आहे. 3300 भागद्वारे या शोने आणखी एक मैलाचा दगड पार केला आहे. ही फक्त एक संख्या आहे. आमच्यासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा शो गेल्या तेरा वर्षांत लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यात यशस्वी झाला आहे. इतक्या वर्षांच्या प्रेमासाठी आणि पाठिंब्याबद्दल मी सर्व प्रेक्षक आणि चाहत्यांचे आभार मानतो. तुमचे जीवन हास्य, आनंद आणि सकारात्मकतेने भरेल असा कंटेंट तयार करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.’

'तारक मेहता का उल्टा चष्मा' 28 जुलै 2008 रोजी सुरू झाला आणि आता 13 वर्षांहून अधिक काळ तो यशस्वीपणे चालू आहे. ही सर्वात जास्त काळ चालणारी भारतीय सिटकॉम देखील आहे. या वर्षाच्या सुरुवातीला या शोने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही प्रवेश केला होता. दयाबेन उर्फ ​​दिशा वकानीच्या अनुपस्थितीमुळे हा शो काही दिवसांपासून चर्चेत आहे. दिशा वकाणी शेवटची दयाबेनच्या भूमिकेत दिसल्याला तीन वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. 2017 पासून ती या शोपासून दूर आहे.