
#MeToo Movement: महिलांनी चूल आणि मूलचं सांभाळावे, पुरुषांशी बरोबरी करू नये, असं वादग्रस्त वक्तव्य अभिनेते मुकेश खन्ना (Mukesh Khanna) यांनी केलं होतं. त्यांच्या या विधानानंतर मुकेश खन्ना यांच्यावर टीका होत आहे. अशातचं आता मुकेश खन्ना यांनी त्यांच्या मुलाखतीचा संपूर्ण व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओद्वारे मुकेश खन्ना यांनी हे स्पष्ट केले की, ते कधीही महिलांच्या विरोधात नव्हते. मला खरोखर आश्चर्य वाटते की माझे एक विधान अत्यंत चुकीच्या पद्धतीने घेतले जात आहे. मी महिलांविरोधात असल्याचं म्हटलं जात आहे. जितका मी महिलांचा आदर करतो, तितका आदर कदाचित कोणी करत नसेल. मला महिलांच्या सुरक्षिततेबद्दल काळजी वाटते. बलात्काराच्या प्रत्येक घटनेविरूद्ध मी बोललो आहे, असंही मुकेश खन्ना यांनी या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे.
मुकेश खन्ना यांनी यासंदर्भात बोलताना पुढे सांगितले की, 'महिलांनी काम करू नये, असे मी कधीही म्हटलं नाही. मी तुम्हाला फक्त हे #Me Too चळवळ कशी सुरू झाली ते सांगत होतो. आपल्या देशात महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपले स्थान निर्माण केले आहे. मी या व्हिडिओमध्ये महिला कामानिमित्त घराबाहेर पडल्यानंतर त्यांना कोणत्या स्वरुपाच्या अडचणी येऊ शकतात, यावर प्रकाश टाकत होतो. जसे की, महिला घराबाहेर पडल्यानंतर घरातील मुले एकटी पडतात. मी पुरुष आणि महिला धर्माबद्दल बोलत होतो, जे हजारो वर्षांपासून चालू आहे. (हेही वाचा - अभिनेत्री रवीना टंडन हिच्या नावाचे खोटे Twitter Account बनवणाऱ्या अज्ञात व्यक्तीच्या विरोधात FIR दाखल)
माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावू नका. माझे शेवटचे चाळीस वर्षे, माझे चित्रपट प्रवास याची पुष्टी करतो की, मी नेहमीचं स्त्रियांचा आदर केला आहे. या विधानामुळे जर एखाद्या महिलेच्या भावना दुखावल्या असतील तर मी त्यांना सांगू इच्छितो की, मी माझा मुद्दा योग्य पद्धतीने मांडू शकलो नाही.