सण-उत्सव किंवा अगदी एखादा प्रसंग साजरा करणे ही आपली संस्कृती आहे. सेलिब्रेशन म्हटलं की, नातलग, मित्रपरिवार एकत्र जमणं आलंच. परंतु, कोरोना व्हायरसच्या संकटात गर्दी नको म्हणून एकत्र जमणं टाळलं जातयं. साधारण वर्षभरापासून सुरु झालेल्या या संकटाने अनेक नव्या गोष्टी आपल्याला शिकवल्या आणि सुरुवातीला गरजेपोटी स्वीकारलेल्या या गोष्टी नंतर आपण अंगिकारल्याही. जसं वर्क फ्रॉम होम, व्हर्च्युअल मिटिंग्स, इत्यादी. आता तर सेलिब्रेशनही व्हर्च्युअल व्हायला लागले आहे. 'माझ्या नवऱ्याची बायको' (Mazya Navryachi Bayko) मालिकेतील अभिनेता सचिन देशपांडे (Sachin Deshpande) याने आपल्या लेकीचा नामकरण सोहळा व्हर्च्युअली साजरा केला आहे.
नामकरण सोहळ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत त्याने मुलीच्या नावाचा खुलासा केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना त्याने लिहिले की, "नमस्कार सध्याच्या covid परिस्थितीमुळे, कुठलाही समारंभ करण्यावर अनेक बंधनं आली आहेत, पण त्याच बरोबर सोहळे, समारंभ साजरा करण्याच्या नवनवीन कल्पना ही येऊ लागल्या आहेत, म्हणूनच आमच्या मुलीचा Virtual नामकरण सोहळा करण्याचा एक वेगळा प्रयत्न आम्ही करतो आहोत. तुम्हाला विनंती आहे की हा व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की बघा आणि आमच्या लेकी ला आशीर्वाद ही नक्की द्या."
पहा व्हिडिओ:
अभिनेता सचिन देशपांडे याला 24 डिसेंबर रोजी कन्यारत्न प्राप्त झाले. ही गोड बातमी देखील सचिनने खास पोस्टद्वारे चाहत्यांसोबत शेअर केली होती. आता तिचं व्हर्च्युअल बारसं करण्यात आलं असून 'मीरा' असं नाव ठेवलं आहे. कोविड-19 संकटात सचिन देशपांडे याची ही आयडिया अगदी भन्नाट आणि सुरक्षित आहे. या व्हिडिओमुळे व्हर्च्युअल सेलिब्रेशनसाठी अनेकजण प्रोत्साहित होतील, अशी आशा आहे.
दरम्यान, गेली चार-साडेचार वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेत सचिन देशपांडे ने श्रेयसची भूमिका साकारली आहे.