Bigg Boss Marathi 2, August 14, Episode 81 Update: पुन्हा एकदा रेशम आणि मेघा यांच्यामध्ये रंगला टास्क; साप्ताहिक कार्यातून आरोह झाला बाहेर
Bigg Boss Marathi 2, August 14, Episode 81 (Photo Credit : Colors Marathi)

बिग बॉसच्या आजच्या एपिसोडची सुरुवात किशोरी शहाणे यांच्या 'ऋतू हसताना, तू असताना' या गाण्याने होते. त्यामुळे नेहमीप्रमाणे अगदी मनोसोक्त त्या या गाण्यावर नृत्य करतात. त्यानंतर शिव आणि शिवानी आज पहिल्यांदा एकत्र बसून गप्पा मारताना दिसतात. इथे शिवानी शिवकडे तो बोलण्यासाठी किंवा कोणत्याही गोष्टींसाठी उपलब्धच होत नसल्याची तक्रार करते. सध्यातरी शिवने वीणापेक्षा बिग बॉसच्या खेळाकडे लक्ष द्यावे असे शिवानी त्याला समजावून सांगते. त्यानंतरही किशोरी, नेहा, आरोह याच मुद्द्यांवर चर्चा करतात. यावर वीणाचे स्वतःचे स्पष्टीकरण असते की, मला तुमच्यासोबत बसायला आवडत नाही. मला कोणी का जबरदस्ती करावी. थोडक्यात घरातील सदस्य वीणा आणि शिवच्या नात्याच्या विरोधात झाले आहेत.

त्यानंतर बिग बॉसच्या घरात मेघा धाडे, सुशांत शेलार आणि रेशम टिपणीस यांची एन्ट्री होते. मेघा किशोरी किती छान खेळत आहे, ती लोकांना किती आवडते ते सांगते तर सुशांत शिवलाही वीणावरचा फोकस काढून खेळावर फोकस कर असा सल्ला देतो. असाच सल्ला तो वीणालाही देतो. रेशमशी बोलताना हीना आपण इथे एकटे पडलो असल्याचे सांगते. घरातील सदस्य कसे आपल्या विरुद्ध आहेत ते सांगते यावर रेशमही तिला कणखर राहण्याचा सल्ला देते. तर मेघा वीणाशी बोलताना शिवमुळे ती कशी बदलली ते सांगते. आताची जी शांत वीणा दिसत आहे त्यामागे शिवचा हात आहे असे मेघाचे मत ठरते.

त्यानंतर बिग बॉसकडून ‘जुना गडी नवे राज्य’ या साप्ताहिक टास्क देण्यात येतो. इतक्यात 24 तासांसाठी घराबाहेर बाहेर असलेले बिचुकले घरात प्रवेश करतात. घरातील विविध भागांचा ताबा घेण्यासाठी मेघा, रेशम आणि सुशांत एकमेकांशी भिडणार आहेत. (हेही वाचा: आरोहने घेतला शिव वीणाशी पंगा; किशोरी शहाणे नवीन कॅप्टन; बिग बॉसच्या घरात आजचा दिवस ठरला वादाचा)

पहिल्या फेरीत बाथरूमचा ताबा मिळवण्यासाठी रेशम आणि मेघाच्या टीममध्ये बाथटब स्वच्छ ठेवण्यासाठी स्पर्धा होते. यामध्ये नेहा व शिव आणि आरोह व शिवानी अशा टीम्स एकमेकांशी भिडतात. शेवटी नेहमीप्रमाणे मेघा या फेरीत विजयी ठरते. इतक्यात सुशांतच्या टीममधील सदस्य बेडरूममधील मेघाचा झेंडा काढून सुशांतचा झेंडा लावतात. यावरून मेघा आणि सुशांतच्या टीममध्ये शाब्दिक चकमक सुरु होते.

रात्री सर्वजण एकत्र गप्पा मारत असताना वीणाच्या एका वाक्यावरून बिचुकले प्रचंड भडकतात. सर्वांसोमार ते वीणाशी असभ्य भाषेत बोलतात. यावर घरातील सर्व सदस्य त्यांच्यावर चिडतात. अखेर बिचुकले वीणाची माफी मागून विषय संपवतात. त्यानंतर रात्री रेशमच्या टीम मधील नेहा आणि वीणा दुसऱ्या दिवसाची रणनीती आखतात. या दरम्यान आरोह सुशांतचा झेंडा फाडतो त्यावर परत एकदा घरात भांडण सुरु होते.