बिग बॉसच्या (Bigg Boss Marathi 2) घरात 10 आठवडे खिंड लढवल्यावर आजच्या भागात घरातील सदस्यांना बिग बॉसने एक भावनिक गिफ्ट देऊ केले आहे. गतवर्षी प्रमाणे यंदाही सदस्यांना आपल्या कुटुंबातील किंवा अत्यंत जवळच्या व्यक्तीला भेटण्याची संधी मिळाल्याने सर्वांचेच डोळे पाणावले होते.आजच्या भागात Statue- Release या टास्क मध्ये सुरुवातीला सर्व सदस्यांना बिगबॉस तर्फे आहे त्या स्थितीत स्तब्ध राहण्याचे आदेश दिले जातात. ज्यांनंतर किशोरी यांचा मुलगा बॉबी, नेहाचा नवरा नचिकेत, शिवानीचे बाबा व हिनाची आई यांची अनुक्रमे घरात काहीच क्षणासाठी एंट्री होते. खरंतर इतरांच्या कुटुंबियांना बघून सर्वच सदस्य भावनिक होतात पण यावेळेस हीनाची आई शिवानी आणि नेहा समोर अक्षरशः हात जोडते. त्यांचे "हिना चुकते पण तिला सांभाळून घ्या, तिच्या मनात काहीच नाही पण तुम्ही तिला जसं वागवता त्यामुळे आम्हाला त्रास होतो" असे बोल ऐकून शिवानी आणि नेहा या दोघीही टास्क सोडून आधी हिनाच्या आईला मिठी मारून रडू लागतात.
आजच्या भागात हे सुखद सरप्राईझ देण्याआधी बिग बॉसने स्पर्धकांना यंदा तुमच्या जवळच्या मंडळींना घरात भेटीसाठी आणायचे प्रयत्न करूनही अपरिहार्य कारणामुळे हे शक्य झाले नाही असे सांगितले होते ,इतकंच नव्हे तर आपल्या या मस्करीची खात्री पटण्यासाठी बिग बॉसने सदस्यांना आपल्या खास व्यक्तीसाठी पत्र लिहिण्याचे सुद्धा आदेश दिले होते. यानुसार साहजिकच काहीश्या खट्टू मनाने सदस्यांनी पत्रे लिहिली. यांनतर बिग बॉस ने गंमत म्हणून घरातील सर्व सदस्यांसोबत statue- release हा गेम खेळला.
टास्कदरम्यान सर्व सदस्य स्तब्ध असताना अचानक किशोरी शहाणे यांचा मुलगा बॉबी याने घरात एंट्री घेतली आणि इथूनच आजच्या कुटुंबभेट सत्राला सुरुवात झाली. बॉबी याने घरात एंट्री घेतल्यावर सर्वांशी संवाद साधला ज्यात त्याने आपल्या आईला बाहेर खूप मान आहे पण घरात तुम्ही तिला अशी चुकीची वागणूक देणे थांबवा अशी विनंती केली. नेहाचा नवरा नचिकेत याने एक कविता म्हणत घरात एंट्री घेतली अन्य सदस्यांशी भेटून झाल्यावर अखेरीस त्याने नेहाची भेट घेतली मात्र यावेळी नेहा फ्रीझ असल्याने तिला हलणे शक्य नव्हते, पुन्हा एकदा बिग बॉसने गंमत करत नचिकेतला बाहेर निघून येण्यास सांगितले. पण अखेरीस नेहा आणि नचिकेतची भेट सुद्धा बिग बॉसनेच घडवून आणली.
दरम्यान शिवानी सुद्धा आपल्या वडिलांसाठी एक छान पत्र लिहून आपल्या मनातील भावना व्यक्त करते, तर शिवानीचे वडील पाहून हिनाला आपल्या वडिलांची आठवण येते आणि ती पुन्हा रडू लागते. आजच्या भागात या चार सदस्यांचे कुटुंबीय आलेलं पाहायला मिळाली आहे तर उद्या शिवची आई घरात एंट्री घेत असल्याचे दाखवण्यात आले आहे. आता उद्याच्या भागात उर्वरित सदस्यांचे कुटुंबीय घरात आल्यावर नेमके काय घडते हे जाणून घेण्यासाठी पाहत राहा आपला मराठी बिग बॉस सीझन 2!