Bigg Boss Marathi 2, 19 July, Episode 55 Updates: हीनाच्या 'या' कृत्यामुळे संपूर्ण घर झाले तिचे दुश्मन, सदस्यांमध्ये रंगला अनोखा कबड्डीचा सामना
Bigg Boss Marathi 2, 19 July, Episode 55 (Photo Credit : Colors Marathi)

काल शिवने बिग बॉसच्या घराच्या नियमाचा भंग केल्याने त्याला मारण्यासाठी सुपारी दिली गेली होती. शिव ‘खल्लास’ झाल्याने आता त्याचा फोन खुनी असलेल्या नेहाला दिला गेला आहे. मध्यरात्री हीनाकडे असलेल्या नेहाच्या पत्राबाबत दोघींमध्ये भांडण सुरु होते. ते पत्र देण्यासाठी नेहा विनवणी करते मात्र चिडलेली हीना सर्वांना उलट उत्तरे देत राहते. (हीनाच्या भावनांची कोणी कदर करत नाही याबाबत तिचा राग आहे). या भांडणात सर्वज्ञ वीणा आपले विचार मांडतात.

सध्या घरात चालू असलेल्या सांकेतिक खुनाच्या टास्कमुळे सर्वजण घाबरलेले दिसत आहे. अशावेळी हीनाने आपले सर्व समान फडताळात बांधून ठेवले आहे, जेणेकरून त्यातील काही गायब होऊन आपला सांकेतिक खून होणार नाही. मात्र रुपाली आणि शिवानी एकत्र येऊन हीनाचा मेकअप बॉक्स लपवतात. त्यावरून घरात परत एकदा भांडणे सुरु होतात. पुढचा बझर वाजल्यानंतर किशोरी आणि माधव अनुक्रमे शिवानी व वीणा यांची नावे खून होण्यासाठी देतात. शिवानी खुनी असल्याने तिचा खून होऊ शकत नाही. त्यामुळे वीणाचा खून करण्यासाठी नेहाची निवड केली जाते.

वीणाचा खून करण्यासाठी नेहाला शिव आणि वीणाचा डान्स घडवून आणायचा आहे. नेहा डोक्याने हुशारच असल्याने ती बरोबर शिवला आपल्या शब्दांच्या जाळ्यात अडकवून डान्स करायला भाग पडते. अखेर वीणा आणि शिव ‘टिक टिक वाजते डोक्यावर’ या गाण्यावर डान्स करतात. दरम्यान हीना ठरवल्याप्रमाणे नेहाचा फोटो चोरून तो लपवून ठेवते. त्यानंतर घरात वीणाच्या रूपाने 4था खून झाल्याचे सांगितले जाते. पुढच्या बझरला रुपाली हीनाची सुपारी देते.

हीनाचा खून करण्यासाठी शिवानीला तिच्या अंगावर एक ग्लास पाणी ओतायचे आहे. नेहमीप्रमाणे शिवानी अगदी लीलया ही गोष्ट पूर्ण करते व घरात पाचवा खून होतो. शेवटी हीनाला रुपालीने लपवलेला मेकअप बॉक्स सापडतो. (हेही वाचा: सांकेतिक खुनासाठी डबलबार होऊनही हिना पांचाळ सुखरुप; नेहा शितोळे, शिवानी सुर्वे यांचा निशाणा निकामी)

घरात सध्या माधव आणि रुपाली सामान्य नागरिक असल्याने, त्यांचा खून करण्यासाठी अनुक्रमे शिवानी आणि नेहा यांची निवड केली जाते. दोघींनाही खून करण्याचे प्रकार सांगितले जातात. जो खून सर्वात आधी होईल तो ग्राह्य धरला जाईल. अवघ्या काही मिनिटांत शिवानी ती गोष्ट पूर्ण करते व माधवचा खून होतो. त्यानंतर स्वतःला काही झाले असे भासवत अगदी ड्रामा करत, आरडत-ओरडत अभिजित अडगळीच्या खोलीत येतो. सर्वजण काय झाले म्हणून घाबरतात मात्र सध्याची कप्तान रुपाली अतिशय थंड राहून प्रतिसाद दिल्याने, शिव आणि वैशाली तिच्यावर चिडतात. मात्र ती बिग बॉसची घोषणा आल्यावर मी खोली उघडेन असे सांगते. शेवटी सर्वांच्या प्रेशरमुळे रुपाली दरवाजा उघडते.

अभिजित बाहेर आल्यानंतर आपल्या ग्रुपसोबत अनेक गोष्टींची चर्चा करतो. मर्डर मिस्ट्री टास्कमध्ये वीणा, हीना, शिव आणि वैशाली यांनी ज्याप्रकारे वाईट कामगिरी केली त्याबाबत अभिजित सर्वांना झापतो. अखेर टास्क संपल्यावर नेहाच्या पत्राच्या चोरीवरून सर्वजण हीनाशी भांडू लागतात. मात्र हीना इतकी कणखर आहे की ती सर्वांच्या प्रश्नांना उत्तरे देत राहते. रात्री पुन्हा एकदा हीनाचे नेहा आणि रुपालीशी एका पोळी बनवण्यावरून भांडण होते. हिनाची बोलण्याची पद्धत चुकीची होती असे रुपाली म्हणणे असल्याने ती प्रचंड चिडते.

त्यानंतर बिग बॉस घरातील सदस्यांमध्ये कबड्डी हा खेळ रंगतो. प्रो कबड्डीचा पहिला सामना 20 जुलै रोजी खेळला जाणार आहे, त्याचे इथे प्रमोशन केले जाते.