Bigg Boss 13 Winner: सिद्धार्थ शुक्ला ठरला बिग बॉस 13 चा विजेता; आसिम रियाज दुसऱ्या, तर शहनाज गिल तिसऱ्या स्थानी
Sidharth Shukla (Photo Credits: Instagram)

गेले साडेचार महिने संपूर्ण देश ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत होता, अखेर ती वेळ आली. आज बिग बॉस 13 चा (Bigg Boss 13) विजेता घोषित झाला. यंदा घरातील खूप आधीपासून जेतेपदाचा दावेदार मानला गेलेला सिद्धार्थ शुक्ला (Sidharth Shukla) बिग बॉसचा विजेता (Bigg Boss 13 Winner) ठरला आहे, तर आसिम रियाज पहिला रनरअप ठरला. 50 लाख रुपये आणि ट्रॉफी असे बक्षिसाचे स्वरूप आहे.

बिग बॉसचा सीझन 13 हा आतापर्यंतचा सर्वांत हिट व सर्वात जास्त काळ चालणारा सीझन ठरला. या शोने आतापर्यंतचे सर्व जुने रेकॉर्ड मोडीत काढले. भारतीय टेलीव्हिजन क्षेत्रातील एक लोकप्रिय कार्यक्रम म्हणूनही बिग बॉस 13 चे नाव घेतले गेले.

सिद्धार्थ शुक्ला हा बिग बॉसचा विजेता होईल हे खूप आधीपासून माहित झाले होते. ज्या प्रकारे तो खेळत होता ते पाहून फक्त आसिमशीच त्याची स्पर्धा होऊ शकते हे दिसून आले होते. आज या गोष्टीची अधिकृतरीत्या घोषणा झाली. सिद्धार्थ आणि आसिम ही जोडी अगदी पहिल्या दिवसापासून बिग बॉसच्या घरात लोकप्रिय ठरण्यास सुरुवात झाली होती. आधी एकमेकांचे अगदी जवळचे मित्र असलेले हे दोघे नंतर एकमेकांचे कट्टर शत्रू बनले. मात्र यामुळे या दोघांचे वेगळे व्यक्तिमत्व प्रेक्षकांना दिसून आले. अखेर प्रेक्षकांनी विजेत्यापदाची माळ सिद्धार्थच्या गळ्यात घातली.

आजच्या फिनाले मध्ये सिद्धार्थ शुक्ला, आसिम रियाज, रश्मि देसाई, पारस छाबड़ा, आरती सिंह आणि शहनाज गिल असे हे टॉप-6 स्पर्धक पोहचले होते. त्यानंतर 10 लाख रुपये घेऊन पारस छाबड़ा स्वतः स्पर्धेतून बाहेर पडला. पुढे खेळातून आरती सिंह बाहेर गेली व त्यानंतर तिची मैत्रीण रश्मी देसाईसुद्धा टॉप-3 मध्ये स्थान प्राप्त करण्यात अयशस्वी ठरली. त्यानंतर शेहनाजलाही स्पर्धेतून बाहेर व्हावे लागले. (हेही वाचा: सिद्धार्थ शुक्ला सोबतच्या रिलेशनशिप बाबत बिग बॉसची पूर्व विजेती शिल्पा शिंदे हिचा मोठा खुलासा; म्हणते, अशा माणसाने कधीच जिंकू नये शो)

यंदाचा बिग बॉसचा सीझन हा मोठ्या चढ उतारांनी भरलेला होता. सर्वच स्पर्धक अतिशय तगडे होते, त्यात सिद्धार्थ, आसिम, पारस, रश्मी, शेहनाज या स्पर्धकांच्या भांडणांमुळे शोचा टीआरपी प्रचंड वाढला. मात्र शोमध्ये आसिम आणि सिद्धार्थ या दोघांचे योगदान फार जास्त राहिले. शेहनाजने शोला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. या शोमुळे तिला अगदी सिद्धार्थ इतकीच किंवा त्याच्यापेक्षा जास्त प्रसिद्धी मिळाली. सोबतच या शोने विशाल, मधुरिमा, महिरा, देबोलीना, शेफाली जरीवाला, हिमांशी या स्पर्धकांनाही एक वेगळी ओळख मिळवून दिली.