Arshad Warsi म्हणतो, 'आजच्या काळातली कॉमेडी ही काहीशी अश्लीलतेकडे झुकणारी आणि कल्पकतेचा अभाव असलेली'
Arshad Warsi | (Facebook)

आजच्या काळातली कॉमेडी ही काहीशी अश्लीलतेकडे झुकणारी आणि कल्पकतेचा अभाव असलेली आहे, असे मत अर्शद वारसी (Arshad Warsi) याने व्यक्त केले आहे. अर्शद वारसी म्हटलं की कॉमेडी हे समीकरण आता रूढ झालं आहे. मग ती 'गोलमाल' सिरीज असो किंवा 'धमाल'. पण अर्शद वारसीच्या टायमिंगने कायमच लोकांना पोट धरून हसवलं आहे. जेव्हा पासून त्याने मुन्नाभाईच्या सर्किटची भूमिका केली आहे, तेव्हापासून गेली कित्येक वर्ष अर्शद कॉमेडी मध्येच रुळलाय.

एकाच प्रकारच्या भूमिका त्याच्या वाट्याला आल्या आहेत. पण याबाबत अर्शद म्हणतो,''मला कोणीही कॉमेडी सोडून काही दुसरं विचारत देखील नाही. मी या क्षेत्रात आज बरीच वर्ष काम करतोय. पण मला या गोष्टीची अजिबात खंत नाही की माझा एकाच पठडीतल्या भूमिकेसाठी विचार केला जातो. मी माझं काम करतो. मला बाकी गोष्टींचा फरक पडत नाही.'' (हेही वाचा. मुन्नाभाई आणि सर्किटची जोडी पुन्हा एकदा धमाल उडवून देण्यासाठी सज्ज; लवकरच झळकणार रुपेरी पडद्यावर)

आजच्या कॉमेडी चित्रपटांच्या सद्यस्थितीबद्दल विचारले असता अर्शद म्हणतो,''मला हे बोलताना खूप वाईट वाटतंय पण आजच्या बॉलीवूड मधील कॉमेडी ची अवस्था खुप गंभीर झाली आहे. इथे फार कमी लेखक आहेत जे एखादी अभिनव कथा लिहू शकतात. बाकीचे तर सरळ इंटरनेट वरूनच माल मसाला घेतात. तसेच मला वाटते की कॉमेडी खूप अश्लील पद्धतीने मांडली जाते, जे मला वाटतं गरजेचे नसते. तुम्हाला कॉमेडी कल्पकतेने लिहिता आली पाहिजे. कथेवरती मेहनत करण्या ऐवजी आम्ही हल्ली सोयीला जास्त महत्व देताहोत, इथेच सगळं गणित चुकतंय.''

22 डिसेंबरला अर्शदचा 'पागलपंती' हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. अनिस बाझमी दिग्दर्शित या चित्रपटात अनिल कपूर, जॉन इब्राहिम अशी तगडी स्टार कास्ट आहे.