मुन्नाभाई आणि सर्किटची जोडी पुन्हा एकदा धमाल उडवून देण्यासाठी सज्ज; लवकरच झळकणार रुपेरी पडद्यावर
Sanjay Dutt & Arshad Warsi | (Facebook)

मुन्नाभाई आणि सर्किट म्हणजेच संजय दत्त (Sanjay Dutt) आणि अर्शद वारसी (Arshad Warsi) यांची जोडी आता पुन्हा एकदा धमाल उडवून देण्यासाठी सज्ज झाली आहे. आश्चर्य वाटलं ना? हो पण ते दोघं 'मुन्नाभाई' च्या पुढील भागासाठी नव्हे तर एका दुसऱ्याच चित्रपटासाठी एकत्र येत आहेत. स्वतः अर्शद वारसीने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

तब्बल सहा वर्षांनी दोघंही पुन्हा एकत्र येत आहेत. याआधी शेवटचे 'जिल्हा गाझियाबाद' मध्ये सोबत दिसले होते. चित्रपट फारसा चालला नव्हता. पण दोघांच्याही कामाचं कौतुक झालं होतं. यावेळी ते हाऊसफुल 4 चा दिग्दर्शक फरहाद समजी याच्या एका चित्रपटात काम करणार आहेत. त्यांच्या भूमिकांबाबत सांगताना अर्शद वारसी म्हणाला,''संजय दत्त एका आंधळ्या डॉनची भूमिका साकारत आहे. आणि मी त्याच्या डोळ्यांची. थोडक्यात मी अख्ख्या चित्रपटभर त्याला मार्गदर्शन करणार आहे. तो आंधळा आहे हे कोणालाच ठाऊक नाही आणि मीसुद्धा ते कोणाला सांगू शकत नाही, अशा काहीश्या मजेदार पेचप्रसंगात आम्ही सापडलो आहोत." (हेही वाचा. Panipat Sanjay Dutt and Kriti Sanon Look: 'पानिपत' मधील संजय दत्त आणि कृती सेनन यांच्या ऐतिहासिक भुमिकेतील पहिली झलक)

चित्रपटाच्या कथेबाबत विचारले असता अर्शद म्हणाला,''ही साजिद-फरहादची कथा आहे. ही कथा म्हणजे पूर्ण धमाल असणार आहे. पुढच्या वर्षी मार्च किंवा एप्रिलच्या दरम्यान चित्रीकरणाला सुरवात होईल. बुडापेस्टला याचं पहिलं शेड्युल पार पडेल."

'संजू' चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर राजकुमार हिरानी मुन्नाभाईच्या पुढच्या भागाबद्दल विचार करत असल्याच्या चर्चा होत्या. पण पुढे काहीच प्रगती झाली नाही. त्याच्या आधी बरेच वर्षांपूर्वी 'मुन्नाभाई चले अमेरिका' या तिसऱ्या भागाचा एक टीजर प्रदर्शित करण्यात आला होता. पण काही कारणास्तव राजू हिराणीने कथेमध्ये बदल करायचा निर्णय घेतला. त्या निमित्ताने चित्रपट रखडला. आता मुन्नाभाईच्या जगाबाहेरचे हे मुन्ना आणि सर्किट किती धमाल उडवतायत हे बघणं औत्सुक्याचं आहे.