Birthday special : 6 हजार लग्नाचे प्रस्ताव धुडकावणाऱ्या प्रभासबद्दलच्या या गोष्टी कदाचित तुम्हाला माहित नसतील
प्रभास (Photo Credits : File Photo)

एस एस राजामौली यांच्या बाहुबली सिरीजमुळे फेमस झालेल्या प्रभासला आज इतर कोणत्याही परिचयाची गरज नाही. स्वतःच्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रभासने देश-विदेशातील तमाम प्रेक्षकांच्या काळजावर स्वतःचे असे वेगळे नाव कोरले आहे. भारतीयच नाही तर  इतर भाषिक लोकही आज प्रभासला ओळखतात आणि त्याचे चाहते आहेत. यातच प्रभासचे यश दिसून येते. आज प्रभास आपला 39वा वाढदिवस साजरा करीत आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही बाहुबली प्रभासच्या काही अशा गोष्टी सांगणार आहोत ज्या वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

> प्रभासचा जन्म जन्म 23 ऑक्टोबर 1979 रोजी चेन्नई इथे झाला. तुम्हाला हे थोडे मजेशीर वाटेल पण प्रभासचे खरे नाव प्रभास नसून ‘वेंकट सत्यनारायण प्रभास राजू उप्पलपट्टी’ आहे.

प्रभासची कौटुंबिक पार्श्वभूमी सिनेमाची आहे. त्याचे वडील सूर्यनारायण राजू निमार्ते आहेत. तर काका उप्नापती कृष्णम राजू टॉलिवूड स्टार आहेत.

प्रभासने 2002 मध्ये प्रदर्शित झालेला ‘ईश्वर’ या तेलुगु सिनेमातून आपल्या सिने कारकिर्दीची सुरुवात केली आहे. हिंदीमध्ये प्रभास अजय देवगणच्या ‘अ‍ॅक्शन जॅक्सन’मधील एका गाण्यात दिसला होता.

ज्यावेळी प्रभास बाहुबली चित्रपट करत होता त्यावेळी त्याने इतर कोणताही चित्रपट घेतला नाही. बाहुबली हा ड्रीम प्रोजेक्ट असल्याने त्याला फक्त बाहुबलीवरच लक्ष केंद्रित करायचे होते. प्रभासच्या जवळजवळ प्रत्येक सिनेमाचे शुट हे 500 ते 600 दिवस चालते, बाहुबली या सिनेमाचं शुटिंग तर 5 वर्षे सुरू होते.

बाहुबली चित्रपटासाठी प्रभासने तब्बल 30 किलो वजन वाढवले होते. बाहुबलीसाठी बनवलेली बॉडी प्रभासने 4 वर्षे मेंटेन ठेवली होती.

250 करोड रुपयांचे बजेट असलेला बाहुबली चित्रपटासाठी प्रभासने 25 करोड रुपये मानधन घेतले होते. या चित्रपटासाठी मिर्मात्याने 1.5 करोड रुपयांचे जिमचे साहित्य प्रभासला गिफ्ट केले होते. आता प्रभास एका चित्रपटासाठी 30 करोड रुपये मानधन घेतो.

प्रभास ख-या आयुष्यात इंजिनीअर आहे. त्याने हैदराबादच्या श्री चैतन्य कॉलेजमधून बीटेक केले आहे. पण   प्रभासला हॉटेल इंडस्ट्रीमध्ये करिअर करायचे होते. म्हणजेच प्रभास आहे इंजिनिअर, त्याला करिअर करायचे होते हॉटेल इंडस्ट्रीत अन् तो झाला अभिनेता.

आपल्या 16 वर्षांच्या अभिनयाच्या कारकीर्दीमध्ये प्रभासने फक्त 19 चित्रपटांमध्ये काम केले आहे. साहो हा प्रभासचा पहिला हिंदी चित्रपट ठरणार आहे. दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी बाहुबली या सिनेमाने प्रभावित होऊन आपल्या आगामी सिनेमात ‘पद्मावत’मध्ये प्रभासला रतन सिंहचा रोल ऑफर केला होता.

प्रभास हिंदी चित्रपटांचा फारच शौकीन आहे. राजू हिरानीचा ‘3 इडियट्स' आणि 'मुन्ना भाई एम.बी.बी.एस’ हे प्रभासचे आवडते हिंदी सिनेमे आहेत.

बाहुबली करत असताना प्रभासला जगाच्या कानाकोपऱ्यातून लग्नाचे प्रस्ताव येऊ लागले. मात्र प्रभासने ते सर्व धुडकावून लावले. आतापर्यंत प्रभासला तब्बल 6000 लग्नाचे प्रस्ताव आले होते.

प्रभास हा पहिला साउथ इंडिअन अभिनेता आहे, ज्याचा मेणाचा पुतळा बँकॉकच्या मादाम तुसाँ संग्रहालयात ठेवला आहे. हा पुतळा अमरेंद्र बाहुबलीच्या रुपातील आहे