Gayathri aka Dolly D Cruze (PC- Instagram)

Gayathri AKA Dolly D Cruze Passes Away: मनोरंजन विश्वातून एक अत्यंत दु:खद बातमी समोर येत आहे. एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा रस्ता अपघातात मृत्यू झाला असून ही बातमी समोर आल्यानंतर चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. होळीच्या दिवशी अभिनेत्री आपल्या मित्रासोबत घरी येत असताना ही घटना घडली. तेलुगू इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री गायत्री उर्फ ​​डॉली डी क्रूझ (Gayathri aka Dolly D Cruze) हिचे वयाच्या 26 व्या वर्षी एका रस्ते अपघातात निधन झाले. अभिनेत्री ज्या कारमधून प्रवास करत होती त्या कारचा हैदराबादच्या गचीबोवली भागात भीषण अपघात झाला.

होळीचा उत्सव आटोपून शुक्रवारी, 18 मार्च रोजी रात्री उशिरा कार चालवत असलेल्या राठोड या मित्रासोबत ती घरी परतत होती. या अपघातात राठोड यांचाही मृत्यू झाला. रस्त्यावरील दुभाजकाला धडकण्यापूर्वी कारचे नियंत्रण सुटले आणि कार उलटली, असे सांगण्यात येत आहे. (हेही वाचा -Shabaash Mithu Official Teaser Out: तापसी पन्नू स्टारर 'शाबाश मिठू' चित्रपटाचा टीझर रिलीज, Watch Video)

दरम्यान, अपघातानंतर गायत्रीला जागीच मृत घोषित करण्यात आले. तर तिचा मित्र राठोडला बचावासाठी जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, गंभीर दुखापतींमुळे त्यांचा मृत्यू झाला. रस्त्याने चालत असलेल्या 38 वर्षीय महिलेलाही डॉलीच्या कारची धडक बसली. गाडी उलटल्याने महिला गाडीखाली अडकली. डॉली डी क्रुझप्रमाणेच या महिलेनेही अपघातस्थळीचं अखेरचा श्वास घेतल्याचे अहवालात म्हटले आहे.

गायत्री उर्फ ​​डॉली डिक्रूझने सुरुवातीला तिच्या ग्लॅमरस इंस्टाग्राम पोस्ट्सव्यतिरिक्त, जलसा रायडू या तिच्या YouTube चॅनेलद्वारे लोकप्रियता मिळवली. सोशल मीडियावर प्रसिद्ध झाल्यानंतर तिला 'मॅडम सर मॅडम अंते' या वेबसिरीजमध्ये काम करण्याची ऑफर मिळाली. ती अनेक शॉर्ट फिल्म्समध्येही दिसली. त्यांच्या आकस्मिक आणि धक्कादायक मृत्यूने सोशल मीडियाच्या जगात तसेच तेलुगू चित्रपटसृष्टीतील अनेकांना धक्का बसला आहे. गायत्री आता या जगात नाही यावर तिच्या चाहत्यांना अजूनही विश्वास बसत नाहीये.