स्टार किड्सची मार्केट व्हॅल्यू इन कॅश; तैमुर बाहुला बाजारात दाखल
तैमुर अली खान बहुला (Photo Credit: Instagram, @trippiefeat, Siddhi D)

स्टार किड आणि त्यांची लोकप्रियता हा विषय काही नवीन नाही. नेपोटीझमच्या नावाखाली अनेक स्टार किड्सची बॉलीवूडमध्ये एंट्री झाली, मात्र प्रत्येकाच्याच वाट्याला काही कौतुकाचे बोल आले नाहीत. याला अपवाद तैमुर अली खान. बाळाच्या जन्मानंतरच ‘तैमुर’ या नावावरून गदारोळ माजला. तिथूनच या बाळाला प्रसिद्धी मिळण्यास सुरुवात झाली. आता तर तैमुरने घातलेल्या कपड्यांपासून ते त्याच्या बोबड्या बोलांपर्यंत सर्व गोष्टींवर माध्यमांची नजर असते. हीच गोष्ट त्याच्या फोटोंची. तैमुरची एक छबी टिपण्यासाठी कित्येक कॅमेरे त्याच्यावर खिळलेले असतात. अशातच आता बाजारात ‘तैमुर’ खेळणी दाखल झाली आहेत. होय हुबेहूब तैमुरसारखा दिसणारा बाहुला केळरच्या बाजारात विकला जात आहे.

अश्विनी यारदी यांनी आपल्या सोशल अकाऊंटवर या तैमूर बाहुल्याचा फोटो शेअर केले आहे. पांढऱ्या झब्ब्यावर निळ्या रंगाच्या कोट घातलेला हा तैमुर बाहुला अतिशय रुबाबदार दिसत आहे.

आजपर्यंत बॉलीवूडची स्टाईल, कपडे क्रेझ म्हणून बाजारात विकले गेले. बाहुबलीच्या यशानंतर बाजारात बाहुबली साडी हा भन्नाट प्रकारदेखील विकला गेला. शक्तिमान बाहुल्यानेदेखील काही काळ बाजारात धूम माजवली होती. मात्र एखाद्या स्टार किडचा बाहुला बाजारात विकले जाणे हा प्रकार पहिल्यांदाच घडत आहे. तैमुरच्या फोटोंनाही बाजारात चांगलीच मागणी आहे. खुद्द करण जोहरने एका कार्यक्रमात तैमुरचा एक फोटो 1500 रुपयांना विकला जात असल्याचे सांगितले होते.