Sumeet Raghvan And Uddhav Thackeray (Photo Credits: IANS/Insta)

शिवसेना (Shivsena) अध्यक्ष उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी (Maha Vikas Aaghadi) सरकारचा शपथविधी सोहळा आज, 28 नोव्हेंबर (गुरुवारी) सायंकाळी शिवाजी पार्क (Shivaji Park) वर होणार आहे. महाराष्ट्र सत्ता संघर्षातील ट्विस्ट अँड टर्न्स नंतर आज अखेरीस राज्याला आपला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांच्या रूपात मिळणार आहे. या शपथविधीवरून शिवसैनिकांमध्ये जरी उत्साह असला तरी काही माध्यमातून याबाबत संमिश्र प्रतिक्रिया देखील दिल्या जात आहेत. यातीलच एक म्हणजे अभिनेता सुमीत राघवन (Sumeet Raghvan) याने ट्विटरच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. ‘सत्ता आली पण पत्ता गेला’, असं म्हणत सुमीतने उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

सुमित राघवन याने ‘गड आला पण सिंह गेला, पण आज म्हणावं लागेल.. सत्ता आली पण पत्ता गेला, मातोश्री ते सिल्व्हर ओक’, असं ट्विट केले आहे.याखाली ‘बाळासाहेब ठाकरे’ असा हॅशटॅग वापरला आहे. तसेच एक मतदार म्हणून मला माझी फसवणूक झाल्यासारखं वाटत आहे, अशा शब्दांत त्याने नाराजी व्यक्त केली.  Uddhav Thackeray Oath Taking Ceremony Live Updates: महाविकास आघाडीच्या सरकार मध्ये राष्ट्रवादी कडून जयंत पाटील आणि छगन भुजबळ घेणार मंत्रीपदाची शपथ

सुमित राघवन ट्विट

वास्तविक सुमितचा हा राग राज्यात सुरु असणाऱ्या राजकीय नाट्यावरून आहे. निवडणुकीच्या पूर्वी मत मागताना महायुती (शिवसेना- भाजप) आणि निकालानंतर सत्तास्थापनेसाठी महाआघाडी (शिवसेना- काँग्रेस- राष्ट्रवादी) ही फसवणूक आहे असेही मत सुमितने मांडले आहे. या ट्विटवर अनेकांनी पाठिंबा देणाऱ्या तर काहींनी विरोध करणाऱ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. या प्रतिक्रियांना देखील सुमितने उत्तर देत आपली जरी अंतर्गत वाद असले तरी भिन्न विचारसरणीच्या पक्षांशी हात मिळवत उद्धव ठाकरेंनी सत्ता स्थापन केल्याने आपण निराश झाल्याचे म्हंटले आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महिनाभर राजकीय नाट्य सुरु होते, बहुमत आणि मुख्यमंत्रीपदाचा वाद यावरून शिवसेनेने आपला मित्रपक्ष भाजपशी संबंध तोडून थेट राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत हातमिळवणी केली होती. यानंतर मध्येच राष्ट्रवादी नेते अजित पवार यांनी भाजपसोबत हातमिळवणी केली इतकेच नव्हे तर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ सुद्धा घेतली होती. पण बहुमत सिद्ध न करता आल्याने या दोघांनाही राजीनामा द्यावा लागला होता. यानंतर आता महाविकासाआघाडीने पुढाकार घेऊन उद्धव ठाकरे यांच्या वर मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवत सत्ता स्थापनेचा निर्णय घेतला आहे. आज शिवाजी पार्कात घडणार शपथविधी हा याचा पहिला टप्पा असणार आहे.