Pati Patni aur Woh Poster | (Instagram)

बऱ्याच दिवसांपासून चर्चेत असलेल्या 'पती, पत्नी और वो' चा ट्रेलर आता प्रदर्शित झाला आहे. नवरा, बायको आणि त्यांच्या नात्यामध्ये दुराव्याचं कारण ठरू शकणारी 'ती' अशी या चित्रपटाची कथा. या चित्रपटात कार्तिक आर्यन (Kartik Aryan) 'चिंटू त्यागी', भूमी पेडणेकर (Bhoomi Pednekar) त्याची पत्नी 'वेदिका त्रिपाठी' तर अनन्या पांडे (Ananya Pandey) चिंटू त्यागी ला भुरळ पाडणाऱ्या 'तपस्या' च्या भूमिकेत आहे.

चिंटू त्यागी हा वडलांच्या सांगण्यावरून लग्न करतो. पण नंतर ऑफिस मध्ये काम करत असताना त्याची ओळख तपस्याशी होते. तिला पाहताक्षणीच तो तिच्या प्रेमात पडतो, मग त्यानंतर एकीकडे बायको आणि दुसरीकडे प्रेयसी या दोन दगडांवर पाय ठेवलेल्या चिंटू त्यागीची तारेवरची कसरत म्हणजे पुढचा अख्खा सिनेमा असेल.

1978 साली आलेल्या 'पती, पत्नी और वो' चा हा रिमेक आहे. या चित्रपटाची कथाही विवाहबाह्य संबंधावर आधारित होती. संजीव कुमार, विद्या सिंह आणि रंजीत कौर यांच्या मुख्य भूमिका होत्या. विषय काहीसा गंभीर असला तरीही विनोदी पद्धतीने तो मांडण्यात आला होता. म्हणून निव्वळ मनोरंजनाचा हेतू ठेवूनच या चित्रपटाचा रिमेक करण्याचा निर्णय मुदस्सर अजीजने घेतला आहे. (हेही वाचा. नजरेने घायाळ करण्यासाठी Kartik Aryan झालाय सज्ज; 'अखियों से गोली मारे' नवीन रूपात येणार पडद्यावर)

कथा अनेकवेळा हाताळली गेलेली असली तरीही त्याला काहीसा मॉडर्न टच देऊन सादर करण्याचा प्रयत्न या चित्रपटातून झाला आहे. 6 डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.