कार्तिक आर्यन (Kartik Aryan) सध्या त्याच्या आयुष्याच्या 'पर्पल पॅच' मध्ये आहे. अनेक मोठमोठ्या निर्मात्या दिग्दर्शकांची तो पहिली पसंती ठरत आहे. एकीकडे 'दोस्ताना 2' (Dostana 2) आणि 'भूल भुलैया 2' (Bhool Bhulaiya 2) हे सिक्वेल करत असतानाच तो 'पती, पत्नी और वो' च्या रिमेकमध्येही मध्यवर्ती भूमिकेत आहे. तरुणींना आपल्या लूक्सने घायाळ करणारा कार्तिक आता आपल्या नजरेने घायाळ करण्यासाठी सज्ज झाला आहे. 'पती, पत्नी और वो' या सिनेमाच्या माध्यमातून गोविंदा (Govinda) आणि रवीनाचं (Raveena Tondon) 'अखियों से गोली मारे' हे गाणं आता नवीन रूपात पडद्यावर येत आहे.
जुन्या गाण्यांची प्रेक्षकांवर असलेली मोहिनी अजूनही कायम आहे. मग ती अगदी सैगलच्या काळातली गाणी असो, रफी-लता, किशोर-आशाच्या काळातली असो, किंवा नव्वदीमधल्या उदित नारायण, कुमार सानू, अलका याग्निक, साधना सरगम यांच्या गाण्यांची असो. पण जुनं गाणं कुठेही ऐकू आलं की माणूस त्यात रममाण होऊन जातो. अर्थात याचं प्रमुख कारण असतं त्या गाण्यासोबत जोडल्या गेलेल्या आठवणी. मनुष्य हा भूतकाळात जगणारा प्राणी आहे. त्यामुळे जेव्हा अशी जुनी गाणी कानावर पडतात, तेव्हा त्याच्या भूतकाळातील भावना जागृत होतात. हाच धागा पकडून अलीकडच्या सिनेमा निर्माते आणि दिग्दर्शकांनी जुन्या गाण्यांची नवीन व्हर्जन्स काढण्याचं काम हाती घेतला आहे. त्या कारणाने कितीतरी प्रसिद्ध अशा जुन्या गाण्यांचे रिमेक करण्याची सुरवात झाली आणि हल्ली तर बहुतांशी सिनेमामध्ये एक किंवा कधी कधी दोन गाणी सुद्धा रिमेक केलेली असतात. पण या सगळ्या मध्ये मूळ कलाकृतीचा गाभा ठेवून आणि आशयाला धक्का ना पोचवता ती नवीन ढंगात बांधली जाणं ही खरी कसोटी असते. या विवंचनेत काही संगीत दिग्दर्शक फसतात आणि 'ना घर का, ना घाट का' अशी गत मूळ उत्तम चालीची होऊन जाते. तर दुसरीकडे काही वेळा त्या गाण्याचं जुनं आणि नवं अशी दोन्ही व्हर्जन्स हिट होऊन जातात. या दोहोंमधील समतोल साधता येणं खूप गरजेचं ठरतं.
(हेही वाचा. मामा Govinda सोबत शूट करण्यापासून Krushna ला केला गेला मज्जाव; Kapil Sharma च्या सेट वर दिसला नात्यातला दुरावा)
आता गोविंदा आणि रवीनाच्या ह्या प्रचंड गाजलेल्या गाण्याचं नवीन व्हर्जन प्रेक्षकांच्या मनावर रुंजी घालण्यात यशस्वी होतं का आणि हे गाणं सुद्धा प्रेक्षकांच्या ओठांवर जुन्या गाण्याप्रमाणेच रुळतं का हे पाहणं औत्सुक्याचा विषय आहे.