ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव यांचे निधन ((Photo credit: YouTube)

भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी’, ‘असेन मी नसेन मी’, ‘अखेरचे येतील माझ्या…’ ‘दिवस तुझे हे फुलायचे’, ‘स्वर आले दुरुनी’, ‘तिन्ही लोक आनंदाने’, ‘जीवनात ही घडी’यांसारख्या एकापेक्षा एक अशा शेकडो दर्जेदार गीतांनी रसिक श्रोत्यांच्या हृदयात अढळ स्थान निर्माण करणारे ज्येष्ठ संगितकार यशवंत देव यांचे निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते. गेले प्रदीर्घ काळ ते आजारी होते. त्यांच्यावर दादर येथील शुश्रूषा रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. तेथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज (मंगळवार, ३० ऑक्टोंबर) सायंकाळी चार वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

दरम्यान, यशवंत देव हे उत्कृष्ट संगीतकार होतेच. पण, ते तितकेच चांगले गीतकारही होते. अनेक गाण्यांना त्यांनी संगीतसाज चढवला. अभंग, भावगीत, लोकगीत, युगलगीत यांसारखे एक ना अनेक गीत प्रकार त्यांनी संगितबद्ध केले. गेले काही दिवस त्यांना अशक्तपणा जाणवत होता. त्यामुळे केलेल्या तपासणीत त्यांना चिकनगुनियाची लागण झाल्याचे पुढे आले. त्यातच त्यांना न्यूमोनियाही झाल्याचे निष्पन्न झाले. या दोन्ही आजारांवर मात करण्यासाठी डॉक्टरांचे प्रयत्न सुरु होते. मात्र, त्याला यश मिळू शकले नाही. संगीतकार यशवंत देव यांना देवेंद्र फडणवीसांची श्रद्धांजली

सन १९२६ मध्ये १ नोव्हेंबर या दिवशी यशवंत देव यांचा जन्म झाला. संगीत त्यांच्या घरातच होते. वडिलांकडून लहानपणीच त्यांना संगीताचे धडे मिळेले. संगीत विश्वात त्यांचे वडीलच त्यांचे पहिले गुरु होते. जी.एन. जोशी आणि गजाननराव वाटवे यांच्या शब्दप्रधान गायकीमुळेच आपण सुगम संगिताकडे वळल्याची आठवण देव नेहमी सांगत.