शेवटी यावर्षीचे सर्वात चर्चित आणि जनता ज्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत होती, त्या प्रियंका आणि निकच्या लग्नाचे विवाहस्थळ निश्चित झाले आहे. ‘फिल्मफेअर’ने दिलेल्या वृत्तानुसार पुढच्या महिन्यात म्हणजे नोव्हेंबरमध्ये प्रियंका चोप्रा आणि निक जोनस विवाहबंधनात अडकणार आहेत. या शाही विवाहसोहळ्यासाठी जोडप्याने चक्क भारतातील, राजस्थानच्या जोधपुर येथील ‘उमेद भवन पॅलेस’ या अलिशान ठिकाणाची निवड केली आहे. गेल्या काही वर्षांपासून उमेद भवन पॅलेस हा डेस्टिनेशन वेडिंगसाठी लोकप्रिय ठरत असून, अनेक दिग्गज मान्यवरांचे विवाह सोहळे याठिकाणी पार पडले आहेत. 2007साठी लिज हर्ले आणि अरुण नायर यांचाही विवाहसोहळा याच ठिकाणी पार पडला होता.
या महिन्याच्या सुरुवातीपासूनच निक आणि प्रियंका राजस्थानच्या दौऱ्यावर होते. उमेद भवन पॅलेस आणि मेहरानगढ फोर्ट या ठिकाणचे या दोघांचे अनेक फोटोज सोशल मिडियावर व्हायरल झाले होते. यावरून हे जोडपे राजस्थान येथे एकमेकांना माळ घालणार असल्याचे अंदाज वर्तवले जात होते. मात्र आता सूत्रांनी फिल्मफेअरला दिलेल्या माहितीमुळे या बातमीवर शिक्कामोर्तब झाले आहे.
लग्नाआधी न्यूयॉर्क येथे प्रियंकाचा ‘ब्राईडल शॉवर’ तसेच इतर विवाहपूर्वीचे समारंभ पार पडणार आहेत. न्यूयॉर्क येथे प्रियंका आणि निक यांचे खूप सारे नातेवाईक आणि मित्र असून, ते सर्वजणच लग्नाला उपस्थित राहतील असे नाही. म्हणून त्या लोकांसाठी वेगळा समारंभ लग्नाआधी आयोजित केला आहे. त्यानंतर 200 जवळच्या लोकांच्या सानिध्यात उमेद भवन येथे या लग्नाचा सोहळा पार पडेल.
प्रियंका ज्या ठिकाणी लग्न करणार आहे तो पॅलेस 75 वर्षे जुना आहे. महाराजा उम्मेद सिंह यांनी 1929 साली या महालाचे बांधकाम सुरु केले. 347 खोल्या असलेल्या या महालाच्या बांधकामासाठी त्याकाळी तब्बल 110 लाख रुपये खर्च आला होता.
रोका झाल्यानंतर प्रियंका आणि निक यांचा साखरपुडा ऑगस्टमध्ये भारतातच पार पडला होता. साखरपुड्याच्या वेळी निकने प्रियंकाला दीड करोड रुपयांची अंगठी घातली होती. त्यामुळे आता दररोज 20 लाख कमावणारी प्रियंका लग्नासाठी किती रुपये खर्च करेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे,