चित्रपटसृष्टीसाठी 2018 हे अतिशय समाधानकारक वर्ष ठरले. चित्रपटांमुळे निर्माण झालेले वाद, लो बजेट चित्रपटांचे यश, स्टारकिड्सचे पदार्पण, स्त्री प्रधान चित्रपटांनी खेचलेली गर्दी अशा अनेक गोष्टींनी हे वर्ष गाजले. यात फक्त बजेट, मोठे कलाकारच नाही, तर चित्रपट हिट होण्यासाठी आशय, चित्रपटाची मांडणी हेदेखील तितकेच महत्वाचे असते हे प्रेक्षकांनी सिद्ध करून दाखवले. एकीकडे आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana), राजकुमार राव (Rajkummar Rao) आणि विकी कौशल (Vicky Kaushal) याच्या अभिनयाची ताकद लोकांना समजली, तर दुसरीकडे आमीर खान – अमिताभ बच्चन यांच्या हिंदोस्तानला प्रेक्षकांनी पूर्णपणे नाकारले. विशेष म्हणजे या संपूर्ण वर्षात कमी बजेट असलेल्या चित्रपटांंनी बॉक्स ऑफिसवर चांगलीच बाजी मारली. चला पाहूया 2018 मधील काही लोकप्रिय चित्रपट
> अंधाधुन (Andhadhun) – आयएमडीबी (IMDB) नुसार हा या वर्षीचा सर्वात लोकप्रिय चित्रपट ठरला आहे. श्रीराम राघवन दिग्दर्शित मर्डर मिस्ट्रीवर आधारित अंधाधुन प्रेक्षकांना अतिशय आवडला. आयुष्मानसोबत राधिक आपटे आणि तब्बू यांच्या भूमिकांचेही बरेच कौतुक झाले. या चित्रपटामुळे चर्चेत आलेला अभिनेता आयुषमान खुराणावर आता बॉलीवूडचा यशस्वी हिरो म्हणून शिक्कामोर्तब झाले.
> बधाई हो (Badhaai Ho) – आयुष्मानचाच अजून एक लो बजेट चित्रपट या वर्षी लोकप्रिय ठरला, तो म्हणजे बधाई हो. अवघ्या 20 करोडमध्ये बनलेला ‘बधाई हो’ हा बॉक्स ऑफीसवर 100 कोटींचा आकडा पार करणारा आयुष्मानच्या करिअरमधील पहिला चित्रपट ठरला. अमित रवींद्रनाथ शर्मा दिग्दर्शित ‘बधाई हो’ हा चित्रपट एका कोणत्याही सर्वसामान्य कुटुंबात उद्भवू शकेल अशा महत्वाच्या गोष्टीवर भाष्य करतो. प्रेक्षकांसोबत समीक्षकांनीही या चित्रपटाचे कौतुक केले होते.
> स्त्री (Stree) – राजकुमार रावचा स्त्री हा या वर्षी आश्चर्यकारकरित्या हिट ठरलेला चित्रपट होय. हॉरर कॉमेडी असलेला हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे. अमर कौशिक दिग्दर्शित या चित्रपटाने तब्बल 200 करोड रुपयांपर्यंत गल्ला जमवला. भय आणि विनोदाचे अफलातून मिश्रण सादर करताना नावाप्रमाणेच स्त्रीभोवती असलेल्या अनेक जुनाट कल्पना, बुरसटलेला दृष्टिकोन यांवरही टीका केली गेली आहे.
> राझी (Raazi) - मेघना गुलजार दिग्दर्शित 'राझी' चित्रपटाने प्रेक्षक आणि समीक्षक अशा दोघांचेही मन जिंकले. या चित्रपटामुळे आलिया भट्टवर कौतुकांचा वर्षाव झाला. विशेष म्हणजे नेहमी इतरांवर टीका करणारी अभिनेत्री कंगना राणावत हिने राझी पाहिल्यानंतर आलियाला बॉलीवूडची क्वीन म्हटले. आपल्या देशासाठी एक मुलगी प्राणाचीही पर्वा न करता पाकिस्तानमध्ये हेर बनून राहते, तिच्या आयुष्यातील घटनांभोवती हा चित्रपट फिरतो. 100 कोटींचा व्यवसाय करणारा आलियाचा हा तिसरा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटामार्फत अजून एक अभिनेता उदयास आला तो म्हणजे विकी कौशल.
> पद्मावत (Padmaavat) - यावर्षीचा सर्वात वादग्रस्त चित्रपट म्हणून ‘पद्मावत’कडे पाहता येईल. प्रदर्शनाआधीच चित्रपटाला कडाडून विरोध झाला होता. या चित्रपटामुळे ठिकठिकाणी दंगेही झाले होते. चित्तोडची राणी पद्मावतीच्या आत्मसमर्पनाची गाथा हा चित्रपट सांगतो. मात्र प्रदर्शनानंतर लोकांनी या चित्रपटाला डोक्यावर घेतले. तब्बल 600 करोड रुपयांपर्यंत कमाई या चित्रपटाने केली. दीपिका पदुकोन, शहीद कपूर यांच्यापेक्षाही जास्त, नकारात्मक भूमिकेत असलेला रणवीर सिंग लोकांना फार आवडला.
> संजू (Sanju) - संजय दत्तचा बायोपिक ‘संजू’ चित्रपटाने भारताबरोबरच विदेशातही चांगलीच लोकप्रियता मिळवली. संजयदत्तच्या व्यक्तिमत्वाच्या अनेक छटा आहेत. आजही लोक एक देशद्रोही म्हणून संजयकडे पाहतात, हाच कलंक पुसून टाकण्यास संजू चित्रपटाने फार मदत केली. संजय दत्तचे खरे रूप या चित्रपटामार्फत लोकांच्या समोर आले. रणबीर कपूर याने संजय दत्तची भूमिका केली होते. याचसोबत परेश रावल आणि मनीषा कोईराला यांच्या भूमिकेचेही कौतुक झाले. संजू हा संपूर्ण जगभरात 2018 मध्ये सर्वात जास्त कमाई करणारा 2 नंबरचा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने 600 करोड रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे.
> 2.0 – सुपरस्टार रजनीकांत आणि अक्षय कुमार यांचा 2.0 हा यावर्षीचा सर्वात सुपरहिट चित्रपट ठरला आहे. कमाईच्या बाबतीत या चित्रपटाने पद्मावत आणि संजूलाही मागे टाकले आहे. ‘तंत्रज्ञान आणि कथा यांचा उत्तम मेळ ‘ 2.0′ मध्ये घालण्यात आला आहे. केवळ मनोरंजन एवढाच उद्देश या चित्रपटाचा नसून यात सामाजिक संदेशही दडला आहे, म्हणूनच प्रेक्षकांनी हा चित्रपट डोक्यावर घेतला. या चित्रपटासाठी जगभरातील 3000 हून अधिक तंत्रज्ञांनी काम केले आहे. शंकर यांनी या चित्रपटावर 550 कोटी रुपये खर्च केला आहे. '2.0' हा चित्रपट भारताच्या इतिहासातील सर्वात महागडा चित्रपट ठरला आहे. मात्र सिनेमागृहात झळकल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच या सिनेमाने 700 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री मिळवली आहे.
> रेस 3 – सलमान खानच्या या चित्रपटाकडून प्रेक्षकांना बऱ्याच अपेक्षा होत्या. बिग बजेट चित्रपट, सलमान खान, अनिल कपूर, बॉबी देओल, डेझी शाह यांसारखी तगडी स्टारकास्ट असूनही प्रेक्षकांची निराशा झाली. तरी हा चित्रपट 300 करोड रुपयांपेक्षा जास्त गल्ला जमवण्यात यशस्वी ठरला. 2008 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रेस’ने एकूण 60 कोटी 83 लाखांची कमाई केली होती तर ‘रेस 2’ची कमाई ही 100 कोटींची होती.
> तुंबाड (Tumbbad) – यावर्षीचा सर्वात लक्षवेधी चित्रपट म्हणून तुंबाडकडे पाहता येईल. चित्रपटाची कथा, दिग्दर्शन, चित्रीकरण, लोकेशन्स, अभिनय, संगीत अशा सर्वच बाबतील तुंबाड अतिशय सरस ठरला. गूढ आणि तितकीच रहस्यमय अशी तुंबाडची कथा 1920 मधील आहे. पुण्यातील एका प्रतिष्ठित बाह्मण कुटुंबाच्या तीन पिढ्यांभोवती फिरणारी ही कथा आहे. तब्बल सहा वर्षे या चित्रपटनिर्मितीची प्रक्रिया चालली. या चित्रपटाचे दिग्दर्शन राही अनिल बर्वे यांनी केली आहे. यात सोहम शाहसोबत ज्योती माळे, अनिता दाते, दीपक दामले आणि रंजिनी चक्रवर्ती यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत.
2018 मध्ये या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर आणि प्रेक्षकांच्या मनावर आपली छाप सोडली. याव्यतिरिक्त असेक अनेक चित्रपट यावर्षी प्रदर्शित झाले, ज्यांना सुपरहिट तर म्हणता येणार नाही, पण प्रेक्षकांकडून त्यांना नक्कीच दाद मिळाली. अशा चित्रपटांमध्ये पटाखा, सुई धागा, ऑक्टोबर, सोनू के टीटू कि स्वीटी, पॅड मॅन, हिचकी, धडक, केदारनाथ या चित्रपटांचा समावेश होऊ शकतो. याचसोबत डिसेंबर महिन्यात ज्या दोन चित्रपटांची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते, त्यातील एक 'झिरो' प्रदर्शित झाला, तर 'सिम्बा' येत्या शुक्रवारी प्रदर्शित होणार आहे.