लोकसभा निवडणुकांसोबत सध्या अजून एक गोष्ट चर्चेत आहे ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बायोपिक. ओमंग कुमार (Omung Kumar) दिग्दर्शित, विवेक ओबेरॉय याची मुख्य भूमिका असलेल्या 'पीएम नरेंद्र मोदी' (PM Narendra Modi) या चित्रपटाचा ट्रेलर होळीच्या दिवशी प्रदर्शित करण्यात आला होता. आता नुकतेच या चित्रपटामधील पहिले गाणे प्रदर्शित झाले आहे. 'सौगंध मुझे इस मिट्टी की ये देश नहीं मिटने दूंगा' अशा ओळी असलेले हे गाणे देशभक्तीने ओतप्रोत भरलेले आहे. सुखविंदर सिंह आणि शशि सुमन यांनी हे गीत गायले असून, शशि-खुशी यांनी संगीत दिले आहे. प्रसून जोशी यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत.
काहीही झाले तरी या देशाला मी वाचवणार, अशी शपथ नरेंद्र मोदी या गाण्यात घेताना दिसून येतात. देशातील गरीब जनतेचे होत असलेले हाल, चाललेली होरपळ पाहून नरेंद्र मोदी कासावीस होतात आणि या लोकांसाठी काहीतरी करायची जिद्द त्यांच्या मनात निर्माण होते याचे चित्रण या गीतात दिसते. नरेंद्र मोदी यांचा गुजरात प्रवास तसेच त्यांच्या राजकीय कारकीर्दीमधील काही महत्वाचे प्रसंग या गीतात दाखवण्यात आले आहेत. (हेही वाचा: तिरंगाच्या रंगातील 'पीएम मोदी' या बायोपिक चित्रपटाचे नवे पोस्टर लॉन्च, प्रदर्शित होण्याची तारीख पुन्हा बदलली)
विवेक ऑबेरॉय, मनोज जोशी यांच्याव्यतिरिक्त दर्शन कुमार, बोमन ईरानी, प्रशांत नारायणन, जरीना वहाब, बरखा बिष्ट सेनगुप्ता, अंजन श्रीवास्तव, यतीन कार्येकर, राजेंद्र गुप्ता आणि अक्षत आर सलूजा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. येत्या 5 एप्रिलला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.