फक्त Zero नाही तर, याआधीही शाहरुखचे अनेक चित्रपट ठरले आहेत सुपरफ्लॉप; पहा यादी
शाहरुख खान (Photo Credits: Facebook SRK FanPage)

वर्षाच्या अखेरी बॉलीवूडचा बादशहा शाहरुख खान (Shah Rukh Khan) चा महत्त्वाकांक्षी ‘झिरो’ (Zero) प्रदर्शित झाला. उत्तम दिग्दर्शन, बॉलीवूडच्या दोन मोठ्या तारका, अजय अतुलचे संगीत आणि शाहरुखची हटके भूमिका, असे असले तरी चित्रपट फ्लॉप ठरला. चित्रपटाचे बजेट 180 करोड असून, 100 करोड रुपयांचीही कमाई झाली नाही. अजूनही शाहरुख या धक्क्यातून सावरत आहे. या चित्रपटाच्या अपयशाचा परिणाम आपल्या करिअरवरही होईल असे शाहरुख म्हणाला होता. तो जेव्हा होईल तेव्हा होईल, मात्र शाहरुखचा चित्रपट सपशेल आपटण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही अनेक वेळा शाहरुखने अपयशाची चव चाखली आहे. चुकीच्या चित्रपटाची निवड म्हणा किंवा चुकीचे ग्रहमान म्हणा उत्तम बजेट, उत्तम तारका असूनही शाहरुखचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफीसवर कमाई करू शकले नाहीत. चला पाहूया कोणते आहेत हे चित्रपट -

अशोका (Asoka) संतोष सिवन यांनी दिग्दर्शित केलेला 2001 सालचा हा चित्रपट. शाहरुख, करीना कपूर यांच्या मुख्य भूमिका, उत्तम कहाणी, बिग बजेट असूनही चित्रपट फ्लॉप ठरला होता. चित्रपटाची कहाणी व्यवस्थित मांडली गेली नसल्याचे प्रेक्षक आणि समीक्षकांनी सांगितले होते.

फॅन (Fan) – 2016 मधील फॅन हा देखील शारुखचा फ्लॉप चित्रपट ठरला होता. या चित्रपटाची कथादेखील फार हटके होती. मात्र प्रेक्षकांनी या चित्रपटाकडे सपशेल पाठ फिरवली. मनीष शर्मा दिग्दर्शित या चित्रपटाला 100 करोड क्लबमध्ये एन्ट्री करण्यासाठी फार झगडावे लागले होते.

पहेली (Paheli) – अमोल पालेकर दिग्दर्शित पहेली, हा चित्रपट 2005 सालचा भारताचा ऑस्करसाठी ऑफीशिअल एन्ट्री होता. शाहरुखचा डबल रोल असूनही त्याची जादू काही प्रेक्षकांवर चालली नाही. उत्तम दिग्दर्शन, कर्णमधुर गाणी, राणीचा लाजवाब अभिनय असूनही हा चित्रपट पूर्णतः फ्लॉप ठरला होता. (हेही वाचा : Thugs of Hindostan च्या अपयशाची जबाबदारी पूर्णपणे माझी- आमिर खान)

स्वदेश (Swades) – समीक्षकांनी गौरवलेला हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर काहीच कमाल करू शकला नाही. आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित या चित्रपटाने अनेक पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवली, मात्र गल्ला जमवण्यात हा चित्रपट अपयशी ठरला. चित्रपटाची कहाणी चांगली होती, लोकेशन्स नयनरम्य होती, संगीतही उत्तम होते मात्र यातल्या एकाही गोष्टीचा फायदा चित्रपटाला झाला नाही.

रा 1 (Ra.One) – शारुखच्या कारकीर्दीमधील हा देखील एक महत्वाचा चित्रपट होता. या चित्रपटाच्या प्रमोशनवरही शाहरुखने बरीच मेहनत घेतली होते. मात्र हा चित्रपट फ्लॉप ठरला. गौरी खान या चित्रपटाची निर्माती होती, तर अभिनव सिंह यांनी याचे दिग्दर्शन केले होते. शाहरुखसोबत करीना कपूर आणि अर्जुन रामपाल यांच्याही या चित्रपटात मुख्य भूमिका होत्या.