Navratri Special : स्त्रीचा सन्मान करणे आवश्यक- अभिनेत्री विदुला चौगुले

नवरात्र सणामुळे सगळीकडेच प्रसन्नतेचे वातावरण पसरले आहे. दांडियाचा जल्लोष ते गरब्याची धमाल आणि सोबत नवरंगांची ओढ असा हा नवरात्र सण सध्या देशभर साजरा होत आहे.

सिनेकलाकार देखील हा सण अगदी उत्साहात साजरा करताना दिसत आहेत. जीव झाला येडापिसा मालिकेचे शूट सांगलीमध्ये सुरू आहे आणि मालिकेमध्ये सिद्धीची भूमिका साकारणारी विदुला चौगुले ही कोल्हापूरची असून तिने प्रेक्षकांसोबत तिच्या नवरात्रीच्या काही आठवणी सांगितल्या...

नवरात्रीच्या आठवणींना उजाळा देत विदुला म्हणाली, "असे म्हणतात, प्रत्येक स्त्रीमध्ये देवीचा वास आहे. नवदुर्गेची नऊ रूपं स्त्रीचे जीवनचक्र दर्शवतात. स्त्री मुलगी आहे, बहीण आहे, पत्नी आहे, प्रेमिका आहे, अनंत काळाची माता आहे. मला असे वाटते, स्त्रीचा सन्मान करणे आवश्यक आहे. तुम्ही देवीची उपासना करा पण स्त्रीचा सन्मान केला नाही तर सर्व व्यर्थ आहे. मी मुळची कोल्हापूरची आहे. कोल्हापूरची अंबाबाई म्हणजे साडेतीन शक्तिपीठापैकी एक आहे. नवरात्रोत्सवादरम्यान दररोज देवीची आरती, विविध रूपात पूजा केली जाते. देशभरातून भाविक दर्शनासाठी येतात. देवीच्या आरतीला जाणे, तिची विविध रुपे पहाणे मला लहानपणापासून आवडते. आमच्या सोसायटीत मी आणि माझ्या मैत्रिणी दांडिया खेळायला जायचो आणि अजूनही जातो. खूप मज्जा येते."