मराठी इंडस्ट्रीमध्ये नेहमीच हटके ट्रेंड घेऊन येणारी अभिनेत्री तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) हिने नवरात्रीच्या (Navratri 2019) निमित्ताने दर दिवशी एका देवीच्या रूपातील लूक सोबत एक खास संदेश देण्याचा उपक्रम सुरु केला आहे. काल, नवरात्रीच्या पहिल्या दिवशी तिने कोल्हापूरच्या अंबाबाईच्या (Ambabai) रूपात फोटो शेअर केला होता तर आज म्हणजेच द्वितीयेच्या मुहूर्तावर तेजस्विनीने कामाख्या देवीच्या (Kamakhya Devi) रूपातील आपला फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. तेजस्विनीने फोटो सोबत समाजात रोज घडत असणाऱ्या बलात्काराच्या घटनांवर (Rape Cases) भाष्य केले आहे.या फोटोमध्ये रक्ताळले हात योनीपर्यंत पोहचू पाहत आहेत आणि या हातांच्या मधोमध फुल वाहून पूजा केलेली योनी आहे असे प्रतीकात्मक रूप दाखवण्यात आले आहे.
Navratri Special : स्त्रीचा सन्मान करणे आवश्यक- अभिनेत्री विदुला चौगुले
भारतातील आसाम राज्यात स्थित कामाख्या मंदिर (Kamakhya Temple) हे जागृत देवस्थान मानले जाते. याठिकाणी कोणतीही मूर्ती नसून मधोमध छेद असलेला सपाट दगड देवीच्या योनीचे प्रतिनिधित्व करतो आणि याच योनीचे पूजन कामख्या मंदिरात केले जाते. तेजस्विनीने आपल्या पोस्ट मधून या देवीचा दाखला दिला आहे. तसेच प्रत्येक नव्या जीवाची निर्मिती ज्या योनी मधून होते त्याच योनीवर बलात्कारी निर्घृण वार होतात हे सहन का व कसे करावे? दुधाचे दात देखील न आलेल्या माझ्या लेकी वासनेला बळी पडतात तेंव्हा त्यासाठी कुणाला जवाबदार ठरवावे ? असा सवाल सुद्धा तिने केला आहे.
तेजस्विनी पंडित इंस्टाग्राम पोस्ट
मागील वर्षी सुद्धा तेजस्विनीने फोटोग्राफर भारत पवार यांच्यासोबत हा उपक्रम केला होता, प्रत्येक दिवशीच्या देवीचे नाव आणि तिच्या रूपातील आपले फोटो शेअर करण्याच्या तिच्या या फोटो सीरिजला चाहत्यांचा भरघोस प्रतिसाद मिळाला होता.यंदा तिने एक खास संदेश देत आपले फोटो शेअर करण्यास सुरुवात केली आहे. अनेकांनी तिच्या या उपक्रमावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.