अभिनेता करण ओबेरॉय याच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेला पोलिसांकडून अटक
Karan Oberoi (Photo Credits-File Photo)

अभिनेता करण ओबेरॉय (Karan Oberoi) याच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. ओशिवरा पोलिसांकडून आज या महिलेवर कारवाई करण्यात आली आहे. तर अटक केल्यानंतर एक धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे.

पोलिसांनी अटक केलेल्या महिलेने तिच्यावरच चाकू हल्ला करवून घेतला होता. त्यानंतर करण ओबेरॉय याच्या विरोधात खोटी तक्रार पोलिसात केली होती असे महिलेने कबुल केले आहे. सकाळी महिला वॉकसाठी गेली असता तिच्यावर दोन जणांनी चाकू हल्ला केला. त्याचसोबत अॅसिड फेकण्याची धमकी देत एक चिठ्ठी तिच्या दिशेने भिरकावली होती. तर चिठ्ठीत करण ओबेरॉय विरुद्ध दाखल केलेली तक्रार पाठीमागे घे असे लिहिण्यात आले होते.

त्यानुसार पोलिसांनी घडलेल्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासत दोघांचा शोध घेतला. या दोघांची पोलिसांकडून चौकशी करण्यात आल्यानंतर त्यामधील एक व्यक्ती महिलेचा वकिल याचा नातेवाईक असल्याचे समोर आले. महिलेवर घडवून आणलेला हल्ला हा नियोजनपूर्वक होता असे सुद्धा अटक केलेल्या व्यक्तींनी म्हटले आहे. तर वकिलाकडून महिलेवर हल्ला करण्यासाठी 10 हजार रुपये देण्यात आले होत असे सुद्धा त्यांनी पोलिसांसमोर कबुल केले.

(महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या करण ओबेरॉय याला जामीन मंजूर)

या माहितीच्या आधारे ओशिवरा पोलिसांनी महिलेला अटक केली आहे. तर अटक केल्यानंतर महिलेने तिच्यावर करण्यात आलेले आरोप हे खोटे असल्याचे म्हटले आहे. परंतु यापूर्वीचा वकिलाने तिला फसवले असल्याचे महिलेने म्हटले आहे.