
2020 हे साल आपल्या सगळ्यांसाठीच कठीण गेल.या वर्षी संपूर्ण जग कोरोना महामारी शी लढत आहे. आणि वर्ष संपत आले तरीही आपण सगळे अजूनही या विषाणूशी सामना करत आहोत.याच बरोबर सिनेसृष्टीसाठीही हे साल तितकेसे चांगले ठरले नाही.यावर्षी अनेक मराठी कलाकार आपल्याला कायमचे सोडून गेले.त्यातले काही वृद्धापकाळामुळे तर काही आत्महत्येमुळे.पाहूयात काही प्रसिद्ध मराठी कलाकार ज्यांनी २०२० साली या जगाला कायमचा निरोप दिला. (Year-Ender 2020: प्रणव मुखर्जी, राम विलास पासवान ते मोतीलाल वोरा यांच्यापर्यंत; 'या' प्रमुख राजकीय नेत्यांचे वर्षभरात झाले निधन )
आशुतोष भाकरे
29 जुलै रोजी 'खुलता खळी खुलेना’ फेम अभिनेत्री मयुरी देशमुख हिचा पती अभिनेता आशुतोष भाकरे याने नांदेडमधील राहत्या घरात आत्महत्या केली. आशुतोष च्या आत्महत्या करण्यामागे नैराश्याचे कारण समोर आले होते.
आशालता वाबगावकर
22 सप्टेंम्बर रोजी मराठी कलाविश्वातील ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे निधन झाले.साताऱ्यातील प्रतिभा हॉस्पिटल येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपूर्वी आशालता यांना करोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र कोविड न्युमोनियामुळे त्यांची प्राणज्योत मालवली आहे.
अविनाश खर्शीकर
8 ऑक्टोबर रोजी मराठी कलाविश्वातील ज्येष्ठ अभिनेते अविनाश खर्शीकर यांचं राहत्या घरी निधन झाले.गुरुवारी (८ ऑक्टोबर) सकाळी १० वाजता हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांची प्राणज्योत मालवली. अविनाश खर्शीकर यांनी चित्रपट, मालिका, रंगभूमी अशा तिन्ही माध्यमांमध्ये काम केले होते आणि त्यांच्या अनेक नाटकांना रसिकांची पसंती ही मिळाली होती. (Year Ender 2020: या वर्षात 'या' 5 गाण्यांनी जिंकल प्रेक्षकांच मन; कोटींमध्ये मिळाले आहेत व्यूज )
कमल ठोके
14 नोव्हेंबरला लागिरं झालं जी या मालिकेत जिजी ही व्यक्तीरेखा साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री कमल ठोके यांचं दीर्घ आजाराने निधन झाले.मराठी कला क्षेत्रातील ज्येष्ठ अभिनेत्री आणि माजी मुख्याध्यापिका अशी कमल ठोके यांची ओळख होती. १४ नोव्हेंबरला बंगळुरू या ठिकाणी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.प्रसिद्ध मालिका लागिरं झालं जीमधून कमल ठोके यांनी प्रेक्षकांच्या मनात जागा मिळवली होती.
जयराम कुलकर्णी
17 मार्च रोजी मराठी चित्रपट सृष्टीमधील ज्येष्ठ अभिनेते जयराम कुलकर्णी यांचे निधन झाले.ते ८८ वर्षांचे होते.जयराम यांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये सहाय्यक अभिनेता म्हणून भूमिका साकारल्या होत्या. ‘चल रे लक्ष्या मुंबईला’, ‘खट्याळ सासू नाठाळ सून’, ‘खरं कधी बोलू नये’, ‘माझा पती करोडपती’, ‘अशी ही बनवाबनवी’, ‘रंगत संगत’, ‘थरथराट’, इत्यादी चित्रपटातील त्यांच्या भूमिका खास ठरल्या.
रवी पटवर्धन
5 डिसेंबर रोजी ज्येष्ठ मराठी अभिनेते रवी पटवर्धन यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.ते 84 वर्षांचे होते.अग्गंबाई सासूबाई ही त्यांची शेवटची मालिका ठरली. या मालिकेत त्यांनी बबड्याचे आजोबा ही भूमिका निभावली.१९७१ मध्ये प्रदर्शित झालेला ‘अशा असाव्या सुना’ हा त्यांचा पहिला मराठी चित्रपट. ‘सिंहासन’, ‘उंबरठा’, ‘बिनकामाचा नवरा’ ते अगदी अलीकडचा ‘हरी ओम विठ्ठला’ हे पटवर्धन यांचे चित्रपट. जवळपास १०० पेक्षा अधिक मराठी चित्रपटांतून त्यांनी काम केले आहे.
गीतांजली कांबळी
24 ऑक्टोबर मालवणी नाट्यक्षेत्रात काम करणा-या अभिनेत्री गीतांजली लावराज कांबळी यांचे कर्करोगामुळे निधन झाले.गीतांजली या मुळच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या होत्या. मुंबईत त्या कामानिमित्त आल्या होत्या. मालवणी भाषेला आणि मालवणी नाटकाला सातासमुद्रापार पोहचवणारे मच्छिंद्र कांबळी यांच्यासोबत गीतांजली यांनी बरंच काम केले होते. याशिवाय भरत जाधवच्या सही रे सही या नाटकातही त्यांनी काम केले होते. त्यांनी 50 हून अधिक व्यावसायिक नाटकात अभिनय केला होता.
मराठी सिनेसृष्टीत पल्या कामाने एक वेगळी ओळख निर्माण केलेल्या या सर्व कलाकारांना वर्षाच्या सरतेशेवटी भावपूर्ण श्रद्धांजली!