सध्या संपूर्ण देश कोरोना व्हायरस (Coronavirus) सारख्या महामारीशी झगडत आहे. देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 9 हजाराच्या वर गेली आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण भारतात लॉकडाऊन (Lockdown) चालू आहे. मात्र अत्यावश्यक सेवांमध्ये असणारे लोक या संकटातही बाहेर काम करत आहेत. अशा लोकांना सलाम करण्यासाठी मराठी चित्रपटसृष्टी एकत्र आली आहे. समीर विध्वंस आणि हेमंत ढोमे (Sameer Vidwans & Hemant Dhome) यांच्या पुढाकारातून मराठी कलाकारांनी एकत्र येऊन ‘तू चाल पुढ’ (Tu Chal Pudha) या गाण्याची निर्मिती केली आहे. या गाण्याच्या माध्यमातून पोलिस विभाग, डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी, सरकारी कर्मचारी, एनजीओ, स्वयंसेवक, सुरक्षा रक्षक, शेतकरी, सर्व त्यावश्यक सेवांमध्ये असणारे विक्रेते अशा सर्वांना या कलाकारांनी मानाचा मुजरा केला आहे.
सध्या लॉक डाऊनमुळे जनता घरी आहे मात्र असे अनेक कर्मचारी आहेत, जे आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्यासाठी बाहेर झटत आहेत. मग ते पोलीस असो, सफाई कर्मचारी असो वा डॉक्टर असो. सध्याच्या या संकटकाळात या सर्वांनीच आपल्या जीवाची बाजी लावली आहे. हे गाणे खास या लोकांसाठी समर्पित केले आहे. या गाण्यामध्ये तब्बल 32 मराठी कलाकार एकत्र आले असून, या सर्वांनी आपापल्या घरीच या गाण्याचे शुटींग केले आहे. (हेही वाचा: कोरोना रुग्ण, डॉक्टर्स यांना मिळणाऱ्या गैरवर्तणूकीवर अनुष्का शर्मा, अजय देवगण यांनी उठवला आवाज; ट्विटच्या माध्यमातून व्यक्त केल्या भावना)
या गाण्यामध्ये, अंकुश चौधरी, स्वप्निल जोशी, सुबोध भावे, जितेंद्र, जोशी, सिद्धार्थ जाधव, प्रसाद ओक, प्रवीण तरडे, चिन्मय मांडलेकर, आदिनाथ कोठारे, सिद्धार्थ चांदेकर, अमेय वाघ, ललित प्रभाकर, अभिनय बेर्डे, गश्मीर महाजनी, प्रियदर्शन जाधव, सई ताम्हणकर, अमृता खानविलकर, सोनाली कुलकर्णी, मुक्ता बर्वे, क्षिती जोग, रिंकू राजगुरू, मृण्मयी देशपांडे, श्रेया बुगडे, अनिता दाते, मिथिला पालकर, स्पृहा जोशी, प्राजक्ता माळी, सायली संजीव अशा कलाकारांचा सहभाग आहे.
या संपूर्ण गाण्यामध्ये अशा अत्यावश्यक सेवांमध्ये कार्यरत असलेल्या लोकांचे विविध फोटोज दाखवण्यात आले आहेत. ज्याद्वारे लोकांना घरीच राहण्याचा संदेश देण्यात आला आहे.