Raudra Marathi Movie Trailer (photo Credit - YouTube)

ऐतिहासिक दस्तावेज व त्यातील गूढता शोधण्याचा मोह प्रत्येकाला कधी ना कधी होत असतो. कधी उत्सुकतेपोटी तर कधी त्यामागे दडलेल्या गुपितांसाठी शोध घेतला जातो. शोधाची अशीच थरारक तितकीच रंजक कथा असलेला एम.जी पिक्चर्स निर्मित व अल्ट्रा मीडिया अॅन्ड एन्टरटेन्मेंट प्रा.लि’.कंपनी प्रस्तुत ‘रौद्र’ हा चित्रपट 1 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. तत्पूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर आणि संगीत अनावरण सोहळा सुप्रसिद्ध युवा संगीतकार निलेश मोहरीर यांच्या हस्ते दिमाखात संपन्न झाला. या चित्रपटाचे लेखन दिग्दर्शन रविंद्र शिवाजी यांनी केले आहे. थरार, उत्कंठा, शोध, संशय, समज-गैरसमज या सगळ्या नजरबंदीच्या खेळातून अनुत्तरित प्रश्नांचा शोध या चित्रपटातून घेतला जाणार आहे.

‘रौद्र’ चित्रपटाच्या ट्रेलरची व गाण्यांची स्तुती करताना संगीतकार निलेश मोहरीर यांनी चित्रपटाच्या संपूर्ण टीमला मनापासून शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी बोलताना अल्ट्रा मीडिया अॅन्ड एन्टरटेन्मेंट प्रा.लि’.कंपनीचे एमडी आणि सीईओ श्री. सुशिलकुमार अग्रवाल म्हणाले की, ‘आम्ही पहिल्यांदाच मराठी चित्रपटाची प्रस्तुती केली असून रौद्र’ चा विषय आम्हाला खूप भावला. या चित्रपटात नवीन कलाकार असून सगळयांनी छान काम केली आहेत. चित्रपट हा नेहमी चांगल्या कलाकारांनी बनतो’, असं सांगताना भविष्यात अधिकाधिक उत्तम चित्रपटांच्या निर्मीतीचा मानस त्यांनी यावेळी बोलून दाखविला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ravindra Shivaji (@ravindra_shivaji)

चित्रपटातील मुख्य कलाकार राहुल पाटील आणि उर्मिला जगताप यांनी ही आपले मनोगत व्यक्त करताना चांगला चित्रपट करण्याची संधी दिल्याबद्दल निर्माता, दिग्दर्शक तसेच अल्ट्राच्या सहकार्याबद्दल आभार मानले. तसेच हा चित्रपट प्रत्येकाला खिळवून ठेवेल असा विश्वास दिग्दर्शक रविंद्र शिवाजी व निर्माता मंगेश गटकळ यांनी बोलून दाखविला.

‘रौद्र’ ची कथा रहस्यभेदाभोवती फिरते. एका पुरातन अमूल्य अशा गोष्टीचे रहस्य जाणून घेण्यासाठी गावात आलेला नायक एका बखरीत असलेल्या वेगवेगळया कोडयांमार्फत रहस्याचा शोध घेत असतो. ही कोडी तो कशाप्रकारे उलगडणार? या कोडयातून त्याला काही गवसणार? की तो त्याच चक्रात अडकणार ? याची रंजक पण थरारक कथा म्हणजे रौद्र’ हा चित्रपट. (हे देखील वाचा: अतुरता संपली! प्रविण तरडेंचा बहुचर्चित ‘सरसेनापती हंबीरराव’ 'या' दिवशी झळकणार रुपेरी पडद्यावर)

राहुल पाटील आणि उर्मिला जगताप ही नवी फ्रेश जोडी या चित्रपटातून प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. त्यांच्यासोबत दीपक दामले, अनिता कोकणे, अमित पडवणकर, ईशान गटकळ आदि कलाकारांच्या चित्रपटात भूमिका आहेत. चित्रपटाची कथा मंगेश बाळासाहेब गटकळ यांची असून पटकथा आणि संवाद रविंद्र शिवाजी यांचे आहेत. मंगेश बाळासाहेब गटकळ या चित्रपटाचे निर्माते तर सहनिर्माते समीर किसन गाडे आहेत. हर्षद गोलेसर, वैष्णवी अडोदे, शुभांगी केदार, शिरीष पवार या गायकांनी यातील गाणी गायली आहेत. संगीताची जबाबदारी अक्षय जाधव यांनी सांभाळली आहे. छायांकन स्वप्निल केदारे आणि संकलन आकाश मोरे यांचे आहे.