झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवरील स्वराज्यरक्षक संभाजी (Swarajya Rakshak Sambhaji) ही मालिका अल्पावधीतच प्रचंड लोकप्रिय ठरली आहे. संभाजी महाराज यांचा संपूर्ण जीवनपट या मालिकेमार्फत उलगडला जात आहे. यामध्ये संभाजी राजे यांच्या समवेत इतर अनेक भूमिकाही लोकप्रिय ठरल्या. यातीलच एक महत्वाचे नाव म्हणजे कोंडाजी फर्जंद. आनंद काळे (Aanand Kale) यांनी ही भूमिका साकारली होती. या भूमिकेला प्रेक्षकांनी जितके प्रेम दिले तितकेच आनंद काळेही लोकप्रिय ठरले. आता आनंद काळे यांची थेट हॉलीवूडमध्ये वर्णी लागली आहे. लवकरच आनंद काळे यांचा हॉलीवूडपट प्रदर्शित होणार आहे.
महाराष्ट्र टाइम्सने याबाबत वृत्त दिले आहे. ‘रिमेम्बर अॅम्निशिया’ (Remember Amnesia) असे या चित्रपटाचे नाव आहे. भारतीय वंशाच्या रवी गोडसे याने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. अॅम्निशिया असलेल्या एका रुग्णाची कथा यामध्ये दाखवण्यात आली आहे. एक भारतीय परदेशी डॉक्टर आपली स्मृती गेल्यानंतर भारतात परत येतो. इथे त्याला आलेल्या अनुभवांवर या चित्रपट बेतला आहे. या चित्रपटात आनंद यांनी समीर नावाची व्यक्तिरेखा साकारली आहे.
या चित्रपटाची प्रदर्शन तारीख अद्याप ठरली नसली तरी, नोव्हेंबरमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. या चित्रपटामध्ये आनंद काळे यांच्यासोबत महेश मांजरेकर आणि श्रुती मराठे हे कलाकर मुख्य भूमिकेत दिसून येत आहेत. या चित्रपटातील बराचसा भाग कोल्हापूर व गोवा इथे चित्रित केला गेला आहे.