Sachin Pilgaonkar (Photo Credits: File)

मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत सुप्रसिद्ध अभिनेते, गायक आणि दिग्दर्शक सचिन पिळगावकर (Sachin Pilgaonkar) यांच्या कार्यालयातून त्यांच्या वडिलांनी कमावलेली सन्मानचिन्हे चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे ही चोरी त्यांच्याच विश्वासू नोकराने केल्याचे उघड झाले आहे. लोकसत्ता ने दिलेल्या वृत्तानुसार, अमृत सोळंकी (35) असे या नोकराचे नाव असून त्याला सांताक्रूझ पोलिसांनी अटक केली आहे. आपल्या नोकराचा हा प्रताप पाहून पिळगावकरांनाही धक्का बसला आहे.

मराठीतील अष्टपैलू व्यक्तिमत्व सचिन पिळगावकर यांचे वडिल दिवंगत शरद पिळगावकर (Sharad Pilgaonkar) हे मराठीतील नावाजलेले चित्रपट निर्माते होते. त्यांना आजवर जी सन्मानचिन्हे मिळाली ती त्यांनी त्यांच्या जुहू येथील कार्यालयात जतन करुन ठेवली होती. काही दिवसांपूर्वी सचिन यांनी कार्यालयाच्या डागडुजीचे काम सुरु केले होते. ते पाहण्यासाठी त्यांची पत्नी सुप्रिया तेथे पोहोचल्या होत्या. दरम्यान त्यांना तेथे सन्मानचिन्हे दिसली नाहीत. त्यांनी याबाबत त्यांचा नोकर अमृत सोळंकी याला विचारले. ज्याला उत्तर देताना सोळंकी याने कार्यालयाचे काम सुरु असताना सन्मानचिन्हे धुळीने खराब होऊ नये म्हणून गोणीत भरुन ठेवली असल्याचे सांगितले. मात्र सध्या ती कुठे गेली हे माहित नसल्याचे सोळंकीने सांगितले. हेही वाचा- Ashi Hi Aashiqui Trailer: अभिनय बेर्डे, हेमल इंगळे यांचा रोमॅन्टिक सिनेमा 'अशी ही आशिकी'चा ट्रेलर,1 मार्चला सिनेमा येणार रसिकांच्या भेटीला

सचिन पिळगावकर यांना हा प्रकार कळताच त्यांनी ताबडतोब सांताक्रूझ पोलीस ठाण्यात तक्रार केली. सचिन आणि सुप्रिया यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी अमृतला अटक केली. खूप वेळ चौकशी केल्यानंतर अमृतने ही सन्मानचिन्हे केवळ 300 ते 500 रुपयांना विकली गेली असल्याची कबुली दिली.

आपल्या वडिलांनी इतकी वर्षे मेहनत करुन कमावलेली सन्मानचिन्हे कवडीमोल पैशाची विकली गेल्याने सचिन पिळगावकर यांना धक्का बसला आहे. मुळात हा प्रताप आपल्या विश्वासू नोकरानेच केला या गोष्टीचे त्यांना दु:ख होत आहे.