क्रांती रेडकर आणि समीर वानखेडे (Photo Credit : Twitter)

एनसीबीचे (NCB) झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी मोर्चा उघडला आहे. वानखेडे यांच्या कार्यपद्धतीवर मलिक सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. आर्यन खान ड्रग प्रकरणात वानखेडे हे चुकीच्या पद्धतीने कारवाई करत असल्याचे मलिक यांनी अनेकवेळा सांगितले आहे. आता ताजी बाब वानखेडे यांच्या जात आणि धर्माशी संबंधित आहे. वानखेडे यांनी जात आणि धर्माचे सत्य लपवल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे. हे प्रकरण चांगलेच गाजत असताना आता वानखेडे यांची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर (Kranti Redkar) पतीची पाठराखण करण्यास पुढे सरसावली आहे.

मलिक यांनी ट्विटरवर एका दस्तऐवजाचे छायाचित्र पोस्ट केले आहे. त्यांनी लिहिले आहे की, ‘बनावटगिरी येथून सुरू झाली.’ हा दस्तऐवज समीर वानखेडे यांचा जन्म दाखला असल्याचा दावा केला आहे. मलिक म्हणतात की, जन्म प्रमाणपत्रानुसार समीरची आई मुस्लीम होती या फोटोसोबत ‘समीर दाऊद वानखेडे’ असे नावही लिहिले आहे.

मलिक यांच्या आरोपाला समीर वानखेडे यांची पत्नी क्रांतीने प्रत्युत्तर दिले आहे. तिने सोशल मीडियावर लिहिले की, ‘मी आणि माझे पती समीर जन्मतः हिंदू आहोत. आम्ही कधीही दुसरा कोणताही धर्म स्वीकारला नाही. आम्ही सर्व धर्मांचा आदर करतो. समीरच्या वडिलांनी माझ्या मुस्लिम सासूशी लग्न केले होते, ज्या आता हयात नाहीत. समीरचे पूर्वीचे लग्न विशेष विवाह कायद्यांतर्गत झाले होते. 2016 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. आम्ही हिंदू विवाह कायदा अंतर्गत 2017 साली लग्न केले.’

मलिक यांच्या या आरोपावर वानखेडे यांच्याकडून अधिकृत निवेदन समोर आले आहे. वानखेडे म्हणाले की, ‘माझे वडील श्री ज्ञानदेव कचरुजी वानखेडे हे 30 जून 2007 रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग, पुणे या पदावरुन सेवानिवृत्त झाले आहे. माझे वडील हिंदू आणि माझी आई स्वर्गीय श्रीमती झहीदा मुस्लिम होत्या. मी भारतीय परंपरेतील बहुधार्मिक आणि धर्मनिरपेक्ष कुटुंबातील आहे. मला माझ्या वारशाचा अभिमान आहे.’

ते पुढे म्हणतात. ‘माझ्या जातीबद्दल अशा वाईट गोष्टी सांगितल्या जात आहेत ज्यांचा ड्रग्स प्रकरणाशी काही संबंध नाही. या प्रकरणात माझ्या मृत आईचे नावही ओढले जात आहे. ज्याला माझी जात आणि धर्माविषयी सत्य जाणून घ्यायचे आहे, ते माझ्या आजोबांचे सत्य जाणून घेण्यासाठी माझ्या मूळ गावी जाऊ शकतात. या सर्वांविरोधात मी कायदेशीर लढा सुरूच ठेवणार आहे.’ (हेही वाचा: Nawab Malik यांचा Sameer Wankhede यांच्याबाबत अजून एक गौप्यस्फोट; ट्वीट केले जातप्रमाणपत्र)

दरम्यान, यूपीएससीच्या नोंदीनुसार, वानखेडे यांनी त्यांच्या परीक्षेदरम्यान समीर ज्ञानदेव वानखेडे म्हणून फॉर्म भरला होता. मात्र, मलिक यांनी शेअर केलेल्या प्रमाणपत्रानुसार त्यांचे नाव समीर दाऊद वानखेडे असल्याचा दावा केला आहे.