'जगू आनंदे, निघू आनंदे' या टॅगलाईनसह जगण्यासोबतच मरणाचाही आनंदोत्सव करण्याचा कानमंत्र देणारा ‘बीफोर आफ्टर एंटरटेंन्मेंट’ प्रस्तुत 'फनरल' हा मराठी सिनेमा 10 जूनला चित्रपटगृहांत येत आहे. या चित्रपटाने पीफ, इफ्फी, राजस्थान,कोकण यांसारख्या देश-विदेशांतील चित्रपट महोत्सवांमध्ये आपला ठसा उमटवला आहे. सिनेसृष्टीची कोणतीही पार्श्वभूमी नसलेल्या निर्माते व लेखक रमेश दिघे व दिग्दर्शक विवेक दुबे या जोडीनं एक छान सामाजिक कथा 'फनरल' (Funral) चित्रपट रूपात मांडली आहे. आयुष्याकडे बघण्याचा अगदी वेगळा विचार घेऊन आलेल्या ‘फनरल’ चित्रपटात आरोह वेलणकर, तन्वी बर्वे, विजय केंकरे, संभाजी भगत, प्रेमा साखरदांडे, हर्षद शिंदे, पार्थ घाटगे, सिद्धेश पुजारे यांच्या भूमिका आहेत.
‘फनरल’ चित्रपटाचे संकलन निलेश गावंड तर छायांकन अनुराग सोळंकी यांनी केले आहे. कलादिग्दर्शन मनोहर जाधव आणि महेश साळगांवकर यांचे आहे. संगीत आणि पार्श्वसंगीत अद्वैत नेमळेकर तर साऊंडची जबाबदारी सूर्या मुकादम आणि गंधार मोकाशी यांनी सांभाळली आहे. क्रीएटीव्ह दिग्दर्शक रमेश दिघे आणि श्रीपाद जोशी आहेत. असोशिएट निर्माते प्रदीप दिघे आहेत. कार्यकारी निर्माते प्रसाद पांचाळ तर सहाय्यक निर्माते विश्वास भोर व सचिन ढमाले आहेत. सहाय्यक दिग्दर्शक दीप व्यास तर चीफ सहाय्यक दिग्दर्शक डॉ. गिरीश मोगली आहेत. (हे देखील वाचा: Veer Murarbaji: रणधुरंधर नरवीर मुरारबाजी देशपांडे यांची यशोगाथा झळकणार रुपेरी पडदयावर)
सामाजिक दृष्ट्या महत्त्वाचा विषय ‘फनरल’ या चित्रपटात मांडण्यात आला आहे. सद्यस्थितीला धरून असलेला हा विषय प्रत्येकाला अंत:र्मुख करेल असे निर्माते व लेखक रमेश दिघे सांगतात. ‘आपल्या रोजच्या जगण्यातील भाव-भावनांचे प्रतिबिंब चित्रपटात उमटले पाहिजे, हाच विचार करुन सर्वसामान्यांच्या जीवनाला भिडणारा विषय ‘फनरल’ चित्रपटात मांडल्याचे दिग्दर्शक व निर्माते सांगतात. ‘फनरल’ १० जूनला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.