अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Photo Credit : Facebook)

इरादा पक्का, नटरंग, अजिंठा, मितवा, हिरकणी अशा अनेक चित्रपटांमधून आपल्या कलेची छाप पाडणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) हिचा आज वाढदिवस. आपल्या वाढदिवसानिमित्त सोनाली कुलकर्णीने आपल्या चाहत्यांना म्हणाल तर गिफ्ट, मात्र म्हणाल एक सरप्राईज दिले आहे. आज सोनाली कुलकर्णीने आपल्या होणाऱ्या नवऱ्याचा फोटो शेअर करत, आपल्या साखरपुड्याची (Engagement) बातमी सांगितली आहे. होय, अनेकांना यावर विश्वास बसत नसेल मात्र हे खरे आहे. महाराष्ट्राची अप्सरा लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. सोनालीच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव कुणाल बेनोडेकर (Kunal Benodekar) असे आहे.

सोशल मिडियावर सोनालीने आपल्या साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहेत. याबाबत बोलताना सोनाली म्हणते, 'आजच्या दिवशी मला एक मोठी बातमी द्यायची आहे. आज मी सर्वांना माझा होणारा नवरा कुणाल बेनोडेकर याची ओळख करून देत आहे. आमचा 2 फेब्रुवारी 2020 ला साखरपुडा झाला आणि आमचा हा आनंद तुम्हा सगळ्यांसोबत वाटण्यासाठी आजच्या पेक्षा योग्य दिवस असूच शकत नाही असे मला वाटते... आपले शुभाशीर्वाद कायम पाठीशी असू द्या...!!!

(हेही वाचा: अनोख्या हेअरस्टाईलमुळे प्रियांका चोप्रा सोशल मीडियावर ट्रोल; पहा व्हिडिओ)

दरम्यान, गेले अनेक दिवस सोनाली कुलकर्णीच्या प्रेमप्रकरणाविषयी चर्चा सुरु होती. काही दिवसांपूर्वी सोनालीने इन्स्टाग्रामवर पारंपरिक वेशभूषेतील फोटो शेअर केला होता. यामध्ये सोनालीने गळ्यात घातलेले मंगळसूत्र उलटे होते, यावरून तिचे लग्न झाले असावे असा अंदाज चाहत्यांनी लावला होता. याआधी सोनालीने काही फोटो आणि व्हिडिओ शेअर करत आपल्या पार्टनरची ओळख करून दिली होती. आज मात्र सोनालीचे साखरपुड्याचे फोटो शेअर करत याबाबत अधिकृतरीत्या घोषणा केली आहे. आता चाहत्यांना उत्सुकता आहे ती तिच्या लग्नाची. कुणालने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड सोशल सायन्स इथून आपले शिक्षण पूर्ण केले असून, तो लंडनचा रहिवासी आहे.