मातृदिनाच्या निमित्ताने अभिनेत्री मुक्ता बर्वे (Mukta Barve) ने 'आईचं बाईपण व बाईचं माणूसपण' या विषयीची सोशल मीडिया वर केलेली पोस्ट सध्या चर्चेत आहे. आपल्या सोशल मीडिया अकाउंट वरून नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या व्हिडिओ मध्ये मुक्ता बर्वे म्हणते, "बाईच्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर, कधी तिच्यावर बंधनं लादून, कधी भीती तर कधी स्वप्न दाखवून, धर्म - परंपरा - संस्कृती या सर्वांचं ओझं वाहण्याची जबाबदारी तिच्यावर सोपवून आणि हे तिला आणि इतरांना कळूच नये म्हणून की काय, पावलापावलावर तिच्या असण्याचंच गौरविकरण करून बाईचं माणूसपणच हिरावून घेण्याची एक सर्वमान्य व्यवस्था आपल्या आजूबाजूला गेली हजारो वर्षे अस्तित्वात आहे".
मातृदिनानिमित्त समाजातील प्रत्येक आईला बाई म्हणून आणि बाईला माणूस म्हणून समजून घेतलं पाहिजे असं आवाहन तिने तिच्या आगामी चित्रपट 'वाय' च्या निमित्ताने सोशल मीडियावर केलंय. अजित सुर्यकांत वाडीकर दिग्दर्शित चित्रपट 'वाय' हा २४ जून २०२२ रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.