Megha Ghadge (Photo Credits: Facebook)

सिनेजगतात काम करताना जितकी मंडळी कामाची प्रशंसा करणारी असतात, तितकीच ट्रोल करणारी, वाईट साईट बोलणारी सुद्धा असतात. याचा अनुभव आजवर अनेक कलाकारांनी घेतला आहे, त्याबद्दल सोशल मीडियावर संताप देखील व्यक्त केला आहे. पण त्यामुळे काही या मंडळींची संख्या कमी झालेली नाही. अभिनेत्रींच्या बाबतीत तर वाट्टेल त्या प्रतिक्रिया देणाऱ्या युजर्सची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अश्लील कमेंट करणं हा जणू काही छंद असल्याप्रमाणे सर्रास जोपासला जात आहे.असाच काहीसा प्रकार मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री आणि नृत्यांगना मेघा घाडगे (Megha Ghadge)हिच्यासोबत घडल्याचं समोर आलं आहे.मेघाच्या पोस्टवर एका युजरनं अश्लील कमेंट केली आहे. या प्रकरणी तिने पोलिसात तक्रार दाखल केली आहे, मात्र, यावेळी पोलिसांकडून आलेला एक वाईट अनुभव सुद्धा तिने शेअर केला आहे. पोलिसांनी ही तक्रार दाखल करून घेताना सुरुवातीला टाळाटाळ केल्याचे मेघाने म्हंटले आहे. भारतातील महिला नेत्यांना ट्विटरवर अपमानास्पद वागणूक; 13.8 टक्के Tweets मध्ये शिव्या व अश्लील शब्दांचा वापर, अहवालात धक्कादायक खुलासा

मेघा घाडगे हिने अलीकडेच फेसबुकवर एका सहकलाकारा सोबतचा फोटो शेअर केला होता. या फोटोवर स्वरूप पांडा नावाच्या युजरनं अश्लील प्रतिक्रिया दिली आहे. अत्यंत घाणेरड्या अशा शब्दांत या युजरनं मेघाच्या फोटोवर कमेंट्स केल्यानं तिच्या चाहत्यांनी या युजरला चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. इतर युजर्सनी नाराजी व्यक्त करत स्वरूप पांडा या युजरला पोलिसांत देण्यात यावं अशी मागणी केली होती.या प्रकारानंतर मेघानं मिरारोडमधील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.मात्र पोलिसांनी तक्रार नोंदवताना टाळाटाळ केल्याचा आरोप मेघाने लावला आहे. बराच वेळ समजावल्यानांतर तब्बल बारा तासांनी पोलिसांनी तक्रार लिहून घेतली असेही तिने सांगितले आहे.

याबाबत मेघाने प्रतिक्रिया देताना 'पोलिसांनी आपल्याला कोणत्याही प्रकारची मदत केली नाही. याप्रकरणी पोलिस ठाण्यातून मला कोणाचाही फोन देखील आला नाही. यामुळं मला जास्त त्रास होत आहे. अश्लील कमेंट करणारी जी कोणी व्यक्ती आहेत्याला अटक करून कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे, दरम्यान या संपूर्ण घटनेमुळं मला प्रचंड मानसिक त्रास झाला असून जर का आमच्या सारख्या व्यक्तींना 12 तास थांबवत असतील तर सामान्य माणसाचं काय होत असेल असाही सवाल तिने केला आहे.