'कोर्ट' (Court Movie) चित्रपटातून रसीक प्रेक्षकांच्या भेटीला आलेले आणि घराघरात पोहोचलेले अभिनेते वीरा साथिदार ( Veera Sathidar) यांचे निधन झाले आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांची कोरोना व्हायरस (Coronavirus) चाचणी पॉझिटीव्ह आली होती. त्यानंतर त्यांच्यावर एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान प्रकृती खालावल्याने मध्यरात्रीच्या सुमारास त्यांचे निधन ( Actor Veera Sathidar Passes Away) झाले. वीरा साथीदार यांच्या निधनामुळे एक बहुआयामी अभिनेता, विचारवंत आणि आंबेडकरी चळवळीतील आधारस्तंभ कोसळल्याची भावना व्यक्त होत आहे.
अभिनेता विरा साथीदार हे कोर्ट चित्रपटामुळे अनेकांपर्यंत पोहोचले होते. मात्र, केवळ अभिनेते अशीच त्यांची ओळख नव्हती. त्याही आधी ते नागपूर येथील प्रसिद्ध विचारवंत, लेख आणि आंबेडकरी चळवळीतील प्रमुख लढवय्ये म्हणून सर्वांना परिचीत होते. आंबेडकरी चळवळीत त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. (हेही वाचा, Actress Shashikala Jawalkar Passes Away: अभिनेत्री शशिकला जवळकर यांचे निधन, वयाच्या 88 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास)
कोर्ट चित्रपटात वीरा साथीदार यांनी साकारलेल्या भूमिकेचे सर्व स्तरातून कौतुक झाले. या चित्रपटाला अनेक पुरस्कारही मिळाले. राष्ट्रीय पुरस्कारानेही या चित्रपटाला गौरविण्यात आले.
वीरा साथिदार यांच्याविषयी थोडक्यात
वीरा साथिदार यांचा जन्म 1960 मध्ये नागपूर येथे झाला. त्यांचे बालपण आणि सुरुवातीचे आयुष्य संघर्षमय गेले. सुरुवातीच्या काळात ते मेंढपाळ म्हणून काम करत होते. दरम्यानच्या काळात त्यांना लोकसंगीत आणि लोकसाहित्याची गोडी लागली. चित्रकला आणि शिल्पकलेसह साहित्यातही वीरा साथिदार यांनी जोरदार मुशाफीरी केली आहे. ते एक कवी आणि गायक म्हणूनही लोकांना परिचीत होते. ते ‘विद्रोही’ या मराठी मासिकाचे संपादक आणि लोकशाही हक्क कार्यकर्ते होते.