मराठी सिनेसृष्टीने पाहिलेला सुवर्णकाळ हा अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde) यांच्याशिवाय अपूर्ण आहे. हिंदी, मराठी सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाच्या खास शैलीने सार्यांची मनं जिंकणार्या या कलाकाराने वयाच्या 50 व्या वर्षीच जगाचा निरोप घेतला. लक्ष्मीकांत बेर्डे यांचं अकाली निघून जाणं कलाविश्वाला मोठा हादरा देणारं होतं. आज त्यांच्या निधनाला 18 वर्ष पूर्ण झाली आहेत. पण त्यांच्या रूपेरी पडदा आणि रंगमंचावरील सहज सुंदर अभिनय आजही लोकांच्या मनावर राज्य करत आहे. नक्की वाचा: Abhinay Berde Video: एक काळ होता जेव्हा लक्ष्मीकांत बेर्डेंचा तो अभिनय अख्या महाराष्ट्राने लक्षात ठेवला होता, तुमचा हा अभिनय उद्याही महाराष्ट्र लक्षात ठेवेल; अभिनेता अभिनय बेर्डेचं वडीलांना अनोख प्रॉमीस.
कलाक्षेत्रात येण्यापूर्वी लक्ष्मीकांत बेर्डे हे लॉटरीची तिकीट विकत असे. रूपेरी पडद्यावर लक्ष्मीकांत यांचा मराठी सिनेसृष्टीतून प्रवेश झाला तो 1984 साली रिलीज झालेल्या 'लेक चालली सासरला' या सिनेमामधून. त्यानंतर 1985 साली आलेल्या धूम धडाका सिनेमामधून त्यांनी करियरची सुस्साट सुरूवात केली.
मराठी सोबतच हिंदी सिनेजगतामध्ये स्वतःच्या हिंमतीवर आपलं नशीब आजमवणार्या आणि लोकप्रियता मिळवणार्या नटांपैकी एक म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे! सलमान खान सोबत 'मैंने प्यार किया' सिनेममाधून लक्ष्मीकांत हिंदी सिनेमातही झळकले. सलमानही या सिनेमाच्या यशाचा वाटा लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत शेअर करतो.
लक्ष्मीकांत बेर्डे आणि महेश कोठारे या जोडगोळीचे अनेक सिनेमे हिट ठरले. एकेकाळी केवळ मैत्रीसाठी महेश कोठारेंसोबत काम करताना लक्ष्मीकांत बेर्डे यांनी अवघे 1 रूपया मानधन घेऊनही काम केले आहे. 'धूमधडाका' सिनेमासाठी त्यांनी चक्क एका रूपयात लक्ष्मीकांत बेर्डेंना साईन करून घेतले होते.
हजरजबाबी स्वभाव, उत्तम विनोदबुद्धी आणि सहज अभिनय करण्याची हातोटी असणार्या लक्ष्मीकांत यांचे निधन किडनीविकाराने झाले. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुलं आहे. लक्ष्मीकांत बेर्डे यांचा लेक अभिनय देखील आता सिनेसृष्टीत आपलं नशिब आजमावत आहे.