शस्त्रक्रियेनंतर पहिल्यांदाच समोर आला तनुजा यांचा फोटो; आजारामुळे ओळखणेही झाले कठीण, चाहत्यांनी व्यक्त केली चिंता
काजोल आणि तनुजा (संग्रहित-संपादित प्रतिमा)

बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री कजोलवर (Kajol) गेल्या काही दिवसांपासून दुःखाचे डोंगर कोसळत आहेत. 27 मे रोजी काजोलचे सासरे वीरू देवगन यांचे निधन झाले. या दुःखातून सावरत असतानाच काजोलची आई, एकेकाळची प्रसिद्ध अभिनेत्री तनुजा (Tanuja) आजारी पडली. बॉलिवूड बबलने दिलेल्या वृत्तानुसार तनुजा यांना डायव्हर्टिक्युलायटीस (Diverticulitis)  हा आजार झाला होता. यासाठीच त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता त्यांच्यावरील शस्त्रक्रिया पार पडली आहे. सर्जरीनंतर पहिल्यांदाच काजोलने आपल्या आईसोबतचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तनुजाला ओळखणेही अवघड ठरत आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून काजोलची आई तनुजा उपचारांसाठी लीलावती रुग्णालयात होत्या. या आजारामध्ये आतड्यांच्या आवरणाच्या कमकुवत भागावर लहान पॉकेट्स म्हणजे डायव्हर्टिक्युला तयार होतात आणि ते सुजतात. परिणामी संसर्ग होऊन फोड येतात. याबाबतीत तनुजा यांच्यावर शस्त्रक्रिया पार पडली. या दरम्यान काजोलला अनेक चाहत्यांनी, मित्रांनी, चित्रपट क्षेत्रातील लोकांनी मेसेजेस-फोन करून आधार दिला. अनेकांनी प्रार्थना केली. आता तनुजा यांची तब्येत स्थिरस्थावर होत असताना, काजोलने तनुजा यांच्यासोबतच एक फोटो पोस्ट करत लोकांचे आभार मानले आहेत.

(हेही वाचा: अभिनेत्री काजोलची आई तनुजा यांना झालाय डायव्हर्टिक्युलायटीस हा दुर्मिळ आजार...पाहा या आजाराची लक्षणे)

फोटोच्या कॅप्शनमध्ये काजोल लिहिते, 'ज्या लोकांनी आमच्यासाठी पार्थना केली, फोन केला त्या सर्वांचे धन्यवाद. आज हे जे हास्य तुम्ही पाहत आहात ते एक कृतज्ञता आहे,’ मात्र तनुजा यांचा हा फोटो पाहून अनेकांनी त्यांच्या परिस्थिती बद्दल चिंता व आश्चर्य व्यक्त केले आहे. या फोटोमध्ये तनुजा यांची तब्येत प्रचंड खालावलेली दिसत आहे, ज्यामुळे त्या ओळखूही येत नाहीत.