हेमा मालिनी (Photo Credits: PTI)

बॉलीवूडची ड्रीम गर्ल आज आपला 70वा वाढदिवस साजरा करत आहे. 70-80च्या दशकात आपले सौंदर्य आणि अभिनयाने तमाम जनतेला भुरळ पाडणाऱ्या या लावण्यवतीचा जन्म 16 ऑक्टोबर 1948 रोजी अम्मनकुडी येथे झाला. अभिनेत्री, नृत्यांगना, दिग्दर्शक, खासदार, समाजसेवक अशा अनके भूमिका पार पाडणाऱ्या हेमा मालिनीचा या वयातही विविध क्षेत्रात सक्रीय सहभाग दिसतो. चला तर पाहूया या ड्रीमगर्लच्या जीवनातील काही रंजक गोष्टी.

‘पांडव वनवासन’ हा तेलुगु चित्रपट हेमा मालिनीचा पहिला चित्रपट होय. तर हेमाने बॉलीवूडमधील कारकिर्दीची सुरुवात ‘सपनों का सौदागर' (1968)पासून केली. सुरुवातीला हेमाला चित्रपटसृष्टीत खूप जास्त प्रमाणात स्ट्रगल करावा लागला. हिंदीमध्ये भाषेमुळे तर तमिळमध्ये ‘स्टारअपील’ नसल्याने अनेक दिग्दर्शकांनी त्यांना नाकारले. 1970च्या ‘जॉनी मेरा नाम’मुळे हेमाला प्रसिद्धी मिळाली. देव आनंद आणि हेमा यांची जोडी प्रेक्षकांना प्रचंड भावली. हेमाला मिळालेल्या लोकप्रियतेमध्ये या चित्रपटामधील गाण्यांचाही हात होता.

रमेश सिप्पी यांच्या चित्रपटांमुळे हेमा मालिनी यांना बरीच सफलता प्राप्त झाली. 'अंदाज' या चित्रपटामध्ये या दोघांनी पहिल्यांदा एकत्र काम केले. पुढे हेमा मालिनी यांना  यश, लोकप्रियता, पैसा सर्व गोष्टी प्राप्त झाल्या त्या रमेश सिप्पी यांच्याच ‘सीता और गीता’मुळे. हा चित्रपट हेमा मालिनी यांच्या करिअरमधील सर्वात सफल चित्रपट ठरला. या चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेअरचा पुरस्कारदेखील मिळाला. मात्र आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा चित्रपट आधी ऑफर झाला होता मुमताज यांना. काही कारणास्तव त्या हा चित्रपट कास्रू शकल्या नाहीत त्यांनतर चित्रपटामध्ये एन्ट्री झाली ती हेमा मालिनी यांची. 70च्या दशकात हेमा मालिनी यांची सुंदरता आणि अभिनयाचा जलवा तमाम प्रेक्षकांच्या काळजावर राज्य करत होता, म्हणून निर्माता प्रमोद चक्रवर्ती यांनी खास हेमा मालिनीसाठी ‘ड्रीमगर्ल’ची निर्मिती केली. ग्लॅॅमरस भूमिकेमधून बाहेर पडून ह्गेमा मालिनी यांनी खुशबू, किनारा, मीरा यांसारखे संवेदनशील चित्रपटही केले. बागबान, वीर-झारा, बाबुल हे गेल्या काही वर्षांमधील हेमा मालिनी यांचे गाजलेले चित्रपट होय.

 

View this post on Instagram

 

Weekend is a time to cherish with family. Sharing something close to my heart ! Have a great weekend ahead.

A post shared by Dream Girl Hema Malini (@dreamgirlhemamalini) on

धर्मेद्र आणि हेमा यांची लव्हस्टोरी तर सर्वांनाच ठाऊक आहे. दोघांमधील केमिस्ट्रीमुळे हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांच्या जोडीला प्रेक्षकांची विशेष प्रसिद्धी लाभली. या दोघांनी तब्बल 35 चित्रपटांमध्ये एकत्र काम केले, यापैकी 20 चित्रपट हे सुपरहिट ठरले होते. हेमा मालिनी आणि धर्मेंद्र 1980 साली विवाहबंधनात अडकले. धर्मेद्र व्यतिरिक्त हेमा मालिनी यांचे नाव संजीवकुमार आणि जितेंद्र यांच्याशी जोडले गेले. जितेंद्र यांच्यासोबत तर हेमा मालिनी यांचा विवाहदेखील होणार होता. मात्र धर्मेद्रमुळे हा विवाह मोडला.

 

View this post on Instagram

 

#ThrowbackMemories

A post shared by Dream Girl Hema Malini (@dreamgirlhemamalini) on

1999 पासून हेमा मालिनी यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. सध्या त्या मथुराच्या खासदार आहेत. 2014च्या निवडणुकीवेळी त्यांनी सादर केलेल्या उत्पन्नानुसार हेमा मालिनी यांच्याकडे वैयक्तिक 178 करोड रुपयांपेक्षा जास्त संपती आहे. 2000 मध्ये भारत सरकारने चित्रपटसृष्टीमधील योगदानासाठी हेमा मालिनीला पद्मश्री पुरस्कार बहाल केला.

हेमा मालिनी यांना इंडस्ट्रीमध्ये आपली जागा निर्माण करण्यासाठी खूप परिश्रम घ्यावे लागले. बॉलिवूडमध्ये बऱ्याच अभिनेत्री होऊन गेल्यात मात्र 'ड्रिम गर्ल'ची जागा अजूनपर्यंत कोणीच घेऊ शकले नाही.