प्रियंका चोपड़ा आणि निक जोनास यांची प्रेमकहाणी लवकरच पडद्यावर; 'देसीगर्ल' बनवत आहे स्वतःच्या लग्नावर चित्रपट
प्रियंका आणि निक जोनास (Photo Credit : Instagram)

आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटी झाल्यावर प्रियंका चोपड़ाच्या (Priyanka Chopra) लोकप्रियतेमध्ये प्रचंड वाढ झाली. हॉलीवूडमध्ये प्रियंकाच्या कलागुणांना वाव मिळाला, त्यामुळे तिच्या विविध भूमिका आपल्याला पाहायला मिळाल्या. सध्या प्रियंका चोपड़ा तिच्या आगामी ‘द स्काय इज पिंक’च्या (The Sky Is Pink) प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या दरम्यान एका मुलाखतीमध्ये प्रियंकाने आपण आपल्या लग्नावर एक चित्रपट बनवत असल्याचा खुलासा केला आहे. हा एक विनोदी चित्रपट (Comedy Film) असून यामध्ये प्रियंका आणि निकची (Nick Jonas) लव्ह स्टोरी पाहायला मिळणार आहे.

प्रियंकाने 'द स्काय इज पिंक' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी फरहानसोबत भारतभरातील सर्व महत्वाच्या टीव्ही शोमध्ये उपस्थिती दर्शवली. चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान मिडियाशी झालेल्या संभाषणात प्रियंकाने तिच्या पुढील दोन चित्रपटांविषयी सांगितले. यातील एक आनंद शीलावर आधारित आहे, तर दुसरा तिच्या लग्नावर आधारित आहे. आनंद शीलावर आधारित चित्रपटाचे लिखाण सुरू झाले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ऑस्कर पुरस्कार विजेते बॅरी लेव्हिन्सन करीत आहेत. 2020 मध्ये या चित्रपटाला सुरुवात होईल. (हेही वाचा: जगातील सर्वात उंच इमारतीवर लग्न करण्यासाठी प्रियंका आणि निकला तिसऱ्या लग्नाचे निमंत्रण)

प्रियंकाने नुकतेच दोन इंग्रजी चित्रपटांचे शुटींग पूर्ण केले आहे. त्यानंतर ती दोन चित्रपट स्वतः प्रोड्यूस करणार आहे. त्यातील एक ती Mindy Kaling सोबत बनवणार आहे. हा चित्रपट कॉमेडी असून, तो तिच्या लग्नावर आधारित असणार आहे. हा चित्रपट प्रियंकाच्या चाहत्यांसाठी पर्वणी असणार आहे. प्रियंकाचे निकला भेटणे, त्यांची लव्हस्टोरी, त्यांचे लग्न या सर्व गोष्टी आंतरराष्ट्रीय इव्हेंट बनल्या होत्या. आता हे नक्की कसे घडले हे आपल्याला चित्रपटाच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे.