जगातील सर्वात उंच इमारतीवर लग्न करण्यासाठी प्रियंका आणि  निकला तिसऱ्या लग्नाचे निमंत्रण
निक आणि प्रियंका (Photo Credits: People)

मोठ्या धुमधडाक्यात बॉलीवूडच्या देसी गर्लचा विवाहसोहळा पार पडला. हिंदू आणि ख्रिश्चन अशा दोन पद्धतीने दोन वेळा प्रियंका आणि निक लग्नबंधनात अडकले. या लग्नातील अगदी विवाहस्थळापासून ते कपडे, दागिने, मेकअप अशा सर्व गोष्टींचे कौतून प्रियंका आणि निकने अनुभवले. क्वांटिको (Quantico) मुळे हॉलीवूडला भुरळ पाडणाऱ्या प्रियंकाचे आंतरराष्ट्रीय स्तरावरही अनेक चाहते आहेत. त्यात निक जोनस हे आधीच हॉलीवूडमधील लोकप्रिय नाव असल्याने, गेला एक महिना याच जोडीची चर्चा आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये रंगलेली होती. प्रियंकाचा भारतातील विवाहसोहळा हा अतिशय जवळच्या लोकांच्या सानिध्यात पार पडला, म्हणूनच आता त्यांच्या आंतरराष्ट्रीय चाहत्यांसाठी प्रियंका आणि निकला तिसऱ्या लग्नासाठी निमंत्रण मिळाले आहे. आश्चर्य म्हणजे हे निमंत्रण चक्क इमार दुबई (Emaar Dubai) यांच्याकडून देण्यात आले असून, तेही जगातील सर्वात मोठ्या इमारतीवर म्हणजेच बुर्ज खलिफा (Burj Khalifa) वर लग्न करण्यासाठी.

होय, इमार दुबई यांनी नुकतेच त्यांच्या ट्वीटरवर यासंदर्भात प्रियंका आणि निकला विचारणा केली आहे. प्रियंका आणि निकच्या प्रेम कहाणीने सर्वानांच भुरळ पाडली आहे, म्हणूनच पुन्हा एकदा विवाहबंधनात अडकण्यासाठी या दोघांना दुबईला येण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. (हेही वाचा : अशी रंगली प्रियंका आणि निकच्या लग्नाची रिसेप्शन पार्टी; नरेंद्र मोदींची उपस्थिती ठरली लक्षणीय)

दुबईची आण, बाण, शान असलेली बुर्ज खलिफा ही जगातील सर्वात उंच मानवनिर्मित इमारत आहे. या इमारतीवर प्रियंका आणि निकचे तिसरे लग्न होण्याची शक्यता आहे. या लग्नाची सर्व तयारी इमार दुबई यांच्याकडून केली जाणार आहे. सध्या हे कपल ओमानमध्ये आपल्या हनिमूनवर आहे, या प्रस्तावाबाबत निक आणि प्रियंकाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली गेलेली नाही.

दरम्यान आता प्रियंका आणि निकच्या मुंबईमधील रिसेप्शनची चर्चा रंगत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रियंका 19 डिसेंबरला तिच्या मित्र परिवारासाठी, तर 20 डिसेंबरला बॉलिवूडसाठी पार्टी देणार आहे. 19 नोव्हेंबरची पार्टी सांताक्रूझमधील एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये ठेवण्यात आली आहे.