Gully Boy Trailer : पद्मावतचे यश, त्यानंतर लग्न, वर्षाखेरीस आलेला 'सिंबा' आणि आता फेब्रुवारीमध्ये प्रदर्शित होणारा ‘गल्ली बॉय’ (Gully Boy). हे पाहून रणवीर सिंग (Ranveer Singh) ची कारकीर्द अगदी जोरात चालू आहे यात काही शंका नाही. रणवीर सिंग आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांचा 2019 मधील एक महत्वाकांक्षी चित्रपट गल्ली बॉयचा ट्रेलर आज प्रदर्शित करण्यात आला आहे. हलाकीच्या परिस्थितीत लहानाचा मोठा झालेल्या एका रॅपरची गोष्ट या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. ‘गल्ली बॉय’मध्ये रणवीर सिंग नावेद शेख नामक युवकाची भूमिका साकारताना दिसणार आहे. हा ट्रेलर पाहून या चित्रपटाचे बरेचसे चित्रीकरण धारावीमध्ये झाले असल्याचे लक्षात येते. या ट्रेलरमधील रणवीर सिंगचा लूकही अगदी खास आहे, जो प्रेक्षकांना आवडेल यात काही शंका नाही.
झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या रणवीरला रॅपर बनायचे असते. मात्र त्याचे कुटुंब त्याच्या या स्वप्नाच्या विरोधात असते. रणवीरला आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी पुढे कोणकोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो, ते केल्यानंतरही तो यशस्वी रॅपर बनतो का? या गोष्टी 14 फेब्रुवारीला उलगडणार आहेत. हा चित्रपट रणवीरच्या आतापर्यंतच्या चित्रपटांपासून थोडा हटके आहे. एक रॅपर म्हणून स्वतःला सिद्ध करण्यासाठीचा झगडा, आणि त्यासाठी घेतलेली मेहनत ही या ट्रेलरमधून स्पष्ट दिसून येते. तसेच आलियादेखील एक परिपक्व अभिनेत्री बनत आहे याचीही झलक दिसून येते. (हेही वाचा : ‘गल्ली बॉय’ सिनेमात रणवीर सिंग, आलिया भट्ट दिसणार ‘या’ अंदाजात)
झोया अख्तर (Zoya Akhtar) यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात प्रथमच रणवीर सिंग आणि आलिया भट्ट ही जोडी एकत्र दिसणार आहे. तसेच मराठी अभिनेत्री अमृता सुभाषही या चित्रपटात एक महत्वाची भूमिका साकारत आहे.