प्रदर्शनानंतर एका दिवसात तमिळ रॉकर्सकडून ‘गली बॉय’ लीक; पाहा काय आहे पहिल्या दिवसाची कमाई
गली बॉय (Photo Credits: Excel Entertainment)

झोया अख्तर (Zoya Akhtar) दिग्दर्शित महत्वकांक्षी आणि बहुप्रतीक्षित 'गली बॉय' (Gully Boy) काल सर्वत्र प्रदर्शित झाला. रणवीर सिंग (Ranveer Singh) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट लोकांच्या पसंतीस उतरत असलेला दिसत आहे. कित्येक मोठ्या वृत्तवाहिन्यांनी, वर्तमानपत्रांनी तसेच समीक्षकांनीही या चित्रपटाची स्तुती केली आहे. मात्र प्रदर्शनानंतर काही तासांतच हा चित्रपट ऑनलाईन लीक झाला आहे. पायरसी करणारी देशातील सर्वात मोठी वेबसाईट तमिळ रॉकर्स (TamilRockers) कडून हा चित्रपट लीक झाला आहे. यामुळे आता चित्रपटाच्या व्यवसायावर या गोष्टीचा चांगलाच परिणाम होणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

तामिळ रॉकर्स या बेवसाइटच्या अनेक मायक्रोसाइट्स ब्लॉक करण्यात आल्या होत्या, मात्र तरीही चित्रपटाची पायरसी रोखण्यात अपयश येत आहे. याआधीही ‘पद्मावत’, ‘सिम्बा’, 2.0, मणिकर्णिका यांसारखे अनेक बिग बजेट चित्रपट या वेबसाईटवर लीक करण्यात आली होते. याविरोधात अनेक निर्माते कोर्टात गेले आहेत, मात्र अजूनही ही वेबसाईट बंद करण्यात यश आले नाही.

मुंबईतील झोपडपट्टीत राहणारा एक सामान्य मुलगा एक लोकप्रिय रॅपर कसा होतो याचा प्रवास या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. चित्रपटाला लोकांचा प्रतिसादही मिळत आहे, मात्र आता हा चित्रपट ऑनलाईन लीक झाल्यानंतर चित्रपटाला तोटा सहन करावा लागणार हे निश्चित आहे. तरी ‘गली बॉय’ने पहिल्या दिवशी 18.70 कोटी रूपयांचा बिझनेस केला आहे. आलियाच्या करियरमधील हा सर्वात मोठा ओपनर ठरला आहे. दरम्यान चित्रपट लीक झाल्याबाबत निर्माते आणि झोया अख्तर काय भूमिका घेतील हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.