नाट्य संमेलनादरम्यान दिंडी (Photo Credit : Youtube)

99 वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन (Akhil Bharatiya Marathi Natya Sammelan) नागपूर येथे पार पडले. काल या संमेलनाचा समारोपाचा कार्यक्रम झाला. प्रेमानंद गज्वी यांच्या अध्यक्षतेखाली सुरु झालेल्या या संमेलनाचे उद्घाटन महेश एलकुंचवार यांनी कले. महाराष्ट्राला नाटकांची फार मोठी परंपरा लाभली आहे, मात्र सध्या काही ठराविक शहरे सोडली तर लोकांनी नाटकांकडे पाट फिरवल्याचे दृश्य दिसते. म्हणूनच नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रमोद कांबळे यांनी काल समारोपाच्या कार्यक्रमात, पुढच्या वर्षी 100 व्या नाट्य संमेलनाच्या निमित्ताने 100 गावांमध्ये नाट्य संमेलन आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगितले. याची सुरुवात सांगली इथून होणार आहे.

समारोपावेळचे प्रेमानंद यांचे भाषण चांगलेच गाजले.  यावेळी 100 ठिकाणी 100 वे नाट्य संमेलन करणार असाल तर त्या गावांत किमान नाटकांचे 100 प्रयोग करा, अशी सूचनाही त्यांनी नाट्य परिषदेला दिली. समारोपाचे प्रमुख पाहुणे म्हणून विनोद तावडे यांचे नाव जाहीर करण्यात आले होते. मात्र ऐनवेळी तावडे यांनी पाट फिरवली. तसेच संमेलनाचे स्वागताध्यक्ष नितीन गडकरी हेही उपस्थित नव्हते. इतक्या मोठ्या नाट्य संमेलनाला सांस्कृतिक कार्यमंत्री न येणे हा चर्चेचा विषय बनला होता.

प्रेमानंद यांनी समारोपाच्या भाषणामध्ये अशोक सराफ, प्रशांत दामले यांच्यासारख्या अभिनेत्यांकडून गंभीर नाटकांची अपेक्षा व्यक्त केली. राज्यात अभिजात मराठी भाषा दिन साजरा करण्यासाठी भाषामंत्री विनोद तावडे यांना पत्र देणार असल्याचे गज्वींनी यावेळी सांगितले. संमेलन आणि वाद या दोन्ही गोष्टी पाचवीलाच पुजल्या असतात, त्या यावेळी दिसल्या. संमेलनाची सांगता होताना ढिसाळपणा, नियोजनातील त्रुटी तीव्रपणे समोर आल्या. स्थानिक नाट्य परिषद शाखांमध्ये झालेले वाद, उद्घाटकांपासून कलाकारांपर्यंत निर्माण झालेली नाराजी यावेळी स्पष्ट दिसून आली.