मुंबईतील तमाम नाट्यरसिकांचे मोक्याचे समजले जाणारे प्रभादेवीतील रविंद्र नाट्यमंदिर पुढील काही दिवस बंद राहणार आहे. ह्या नाट्यगृहात झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे या नाट्यगृहाचे दरवाजे बंद करण्यात आले आहे. प्रभादेवीमध्ये मह्त्त्वाचे असे समजले जाणा-या या नाट्यगृहामध्ये केवळ नाटकांचे प्रयोग न होता अनेक सांस्कृतिक कार्यक्रम ही होत असतात. मात्र आता ऐन सुट्ट्यांच्या काळात हे नाट्यगृह बंद राहणार असल्यामुळे प्रेक्षकांचा हिरमोड झाला आहे.
रविंद्र नाट्यमंदिरामध्ये नुकत्याच झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे इथे सुरू असलेला नाटकाचा प्रयोगही अर्धवटपणे थांबवावा लागला होता. त्यामुळे आता नाट्यगृहाची दुरूस्तीसाठी हे नाट्यगृह बंद ठेवण्याचा निर्णय नाट्यगृहाच्या अधिका-यांनी घेतला आहे. मात्र हे काम कधी पूर्ण होणार आणि नाट्यगृह पुन्हा सुरळीतपणे केव्हा सुरू होणार याबाबत अजूनही अनिश्चितता कायम आहे.
मात्र सुट्ट्यांचा कालावधी लक्षात घेता, लवकरात लवकर हे नाट्यगृह सुरु करु असे रविंद्र नाट्यमंदिराचे संचालक बिभीषण चावरे यांनी सांगितले आहे. मात्र त्यासाठी सरकारी पातळीवरही प्रत्यक्षात हालचाली होणे अपेक्षित आहे असेही ते म्हणाले.
World Theatre Day 2019: मराठी रंगभूमी वर सुरू असलेली ही '5' सध्याची धम्माल नाटकं पाहिलीत का?
रविंद्र नाट्यमंदिरात अनेक सांस्कृतिक कार्यक्रम, सेमिनार्स, पक्षांचे मेळावे आणि सरकारी कार्यक्रम होत असतात. मात्र हेच नाट्यगृह अनेकदा नानाविध समस्यांनी वेढलेले दिसते.