‘कौन बनेगा करोडपती’ छोट्या पडद्यावरील एक लोकप्रिय कार्यक्रम. अमिताभ बच्चन यांच्या सुत्रसंचालनाने या कार्यक्रमाला चार चांद लावले. त्यानंतर इतर विविध भाषांमध्ये या कार्यक्रमाचे पर्व सुरु झाले. मराठीमध्येही 2013 साली 'कोण होईल मराठी करोडपती' या कार्यक्रमाच्या पहिल्या पर्वाला तुफान प्रतिसाद मिळाला. आता या कार्यक्रमाचे मराठीमधील तिसरे पर्व येऊ घातले आहे. यासाठी सूत्रसंचलनाची जबाबदारी कोणाला मिळेल याची चांगलीच चर्चा रंगली होती. मात्र आता या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. तर मराठी ‘कौन बनेगा करोडपती’च्या या नव्या पर्वाचे सूत्रसंचालन करणार आहेत लोकप्रिय दिग्दर्शक नागराज मंजुळे.
पहिल्या पर्वाचे सूत्रसंचालन सचिन खेडकेर यांनी केले होते. त्यानंतर दुसऱ्या पर्वासाठी स्वप्निल जोशीने सूत्रसंचालकाची जबाबदारी पार पाडली होती. सैराटमुळे संपूर्ण देशात नाव झालेले नागराज आता तिसऱ्या पर्वानिमित्त छोट्या पडद्यावर अवतरणार आहेत. सोनी मराठी या वाहिनीवर या पर्वाची सुरुवात होणार आहे, नागराज मंजुळे यांनी या शोचा प्रोमो आपल्या फेसबुकवर पोस्ट केला आहे.
(हेही वाचा: दिग्दर्शक नागराज मंजुळे लवकरच Sairat 2 प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार)
या नवीन पर्वात कोणकोणते नवीन बदल असतील आणि कोणत्या नवीन लाइफलाइन्स असतील हे येत्या काही दिवसांतच स्पष्ट होईल. नागराज यांनी आतापर्यंत आपल्या चित्रपटांमुळे छोट्या पाड्यावर विविध कार्यक्रमांत उपस्थिती दर्शवली आहे. मात्र आता संपूर्ण शो सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर असणार आहे, त्यामुळे प्रेक्षकांमध्ये याबाबत कमालीची उत्सुकता दिसून येत आहे.