प्रदर्शनाच्या आधीच अनेक अडचणींचा सामना करावा लागलेला 'बाला' अखेर या आठवड्यात प्रदर्शित झाला. एकवेळ तर अशी सुद्धा आली होती की चित्रपट प्रदर्शित होतो की नाही इथवर मजल गेली होती. पण सगळ्या अडचणींवर मात केल्यानंतर या चित्रपटाने बॉक्स ऑफिस वर दमदार सुरवात केली आहे.
पहिल्या दिवशी या चित्रपटाने 10.15 कोटींची कमाई केली आहे. हा चित्रपट पहिल्याच दिवशी दोन आकडी संख्या गाठेल ही अपेक्षा होतीच, कारण आयुष्मानचं नाव चित्रपटाशी जोडलेलं आहे, आणि बाला त्या अपेक्षांवर खरा उतरला. त्याच्या या आधीच्या चित्रपटाने 'ड्रीम गर्ल' ने पहिल्या दिवशी 10.05 कोटींची कमाई केली होती. आयुष्मानच्या कुठल्याही चित्रपटाची ही पहिल्या दिवशीची सर्वाधिक कमाई आहे. आयुष्मानचे गेले सहाही चित्रपट 100 कोटींच्या घरात गेलेले आहेत. 'बरेली की बर्फी' पासून सुरु झालेली ही मालिका 'शुभ मंगल सावधान', 'अंधाधुन', 'बधाई हो', 'आर्टिकल 15', ते 'ड्रीम गर्ल' पर्यंत सुरूच आहे. आता बाला सुद्धा ही मालिका पुढे सुरु ठेवेल हीच त्याची अपेक्षा असेल. (हेही वाचा. Ayushmann Khurrana च्या Bala वर कायमस्वरूपी बंदी लादण्यात यावी; कमलकांत चंद्रा यांचे विधान)
अमर कौशिकने दिग्दर्शित केलेला हा चित्रपट स्वतःवर प्रेम करायला शिकवणारा आहे. तुमच्या मध्ये कसलीही, कुठल्याही प्रकारची कमी असेल तरीही त्याचा न्यूनगंड न बाळगता स्वतःचा अभिमान बाळगायला शिकवणारा हा चित्रपट. अकाली आलेल्या टकलेपणाचा विषय घेऊन विनोदी पद्धतीने हा विषय मांडण्यात आला आहे. अमर कौशिकचा आधीच चित्रपट 'स्त्री' ने सुद्धा 100 कोटींचा गल्ला जमवला होता.