Ayushmann Khurrana च्या Bala वर कायमस्वरूपी बंदी लादण्यात यावी; कमलकांत चंद्रा यांचे विधान
Bala Poster | (Picture Credit: Instagram)

आयुष्मान खुरानाच्या  (Ayushmann Khurrana) 'बाला' (Bala) वरील अडचणी कमी व्हायचं नाव घेत नाहीयेत. रोज एखादा नवा मुद्दा उपस्थित होऊन बाला चा पाय आणखी गोत्यात घालतोय. मध्यंतरी कमालकांत चंद्रा यांनी आयुष्मान आणि चित्रपटाच्या निर्मात्यांविरोधात गुन्हा दाखल करत वाङ्मयचौर्याचा आरोप केला होता. आता चंद्रा यांनी बाला वर कायमस्वरूपी बंदी आणावी असे आवाहन कोर्टाला करत ही आत्मकथा असल्याचे सांगितले आहे.

यासंदर्भात बोलताना चंद्रा म्हणतात,''मी 2017 च्या सुमारास आयुष्मानला भेटलो होतो. त्यावेळी तो 'बरेली की बर्फी'च्या प्रमोशन मध्ये व्यस्त होता. मला या कथेवर चित्रपट काढायचा होता आणि त्यामध्ये आयुष्मानने मुख्य भूमिका साकारावी अशी माझी इच्छा होती. तरीसुद्धा मी त्याला माझी कथा पाठवली. पुढच्या एका वर्षात मी या गोष्टीचा बराच पाठपुरावा केला. अखेर एक दिवस आयुष्मानच्या मॅनेजरने मला फोन करून सांगितले की याक्षणी तो टकल्या व्यक्तीची भूमिका स्वीकारण्यास तयार नाही. नंतर 2018 च्या डिसेंबर मध्ये माझ्या असे वाचनात आले की आयुष्मान एका चित्रपटात टकल्या व्यक्तीची भूमिका साकारत आहे, जो चित्रपट माझा नव्हता. मला खूप धक्का बसला. मी त्यांना कायदेशीर नोटीस तर घडलीच वर त्यांच्याविरोधात गुन्हा सुद्धा दाखल केला. पण त्यावेळी मला निर्माते म्हणाले की आम्ही अजूनही स्क्रिप्टवरती काम करीत आहोत." (हेही वाचा. मुलांसह रितेश देशमुख घालतोय 'बाला बाला' या गाण्यावर धिंगाणा, पाहा संपूर्ण व्हिडिओ)

या सर्व घटनाक्रमानंतर 'बाला' या चित्रपटाने आपल्या चित्रीकरणाला सुरुवात केली. हा मामला सुप्रीम कोर्टापर्यंत पोचला. 4 नोव्हेंबरला त्याची सुनावणी होती. पण सुप्रीम कोर्टाने या खटल्याची जबाबदारी उच्च न्यायालयावर सोपवत 'बाला' च्या प्रदतर्शना आधी त्याचा निकाल लावण्याच्या सूचना दिल्या.

याबाबत बोलताना चंद्रा म्हणतात,''माझ्या मते या चित्रपटावर पूर्णपणे बंदी लादण्यात यावी आणि मला या विषयावर चित्रपट करायची संधी मिळावी. कारण खरं तर ही माझ्या आयुष्याची कथा आहे. हा माझा जीवनपट आहे."

आता या सर्व अडचणींवर मात करून 'बाला' चित्रपट प्रदर्शित होणार, की चंद्रा यांचा दावा खरा ठरून चित्रपट कायमचा रखडणार हे येणार काळच ठरवेल.