Kangana Ranaut च्या खार येथील घरावरही पडणार हातोडा? घर बनविताना अभिनेत्रीने केले नियमांचे उल्लंघन; मुंबई कोर्टाने फेटाळून लावली कंगनाची याचिका
कंगना रानौत (Photo Credits: Instagram)

काही आठवड्यांपूर्वी बीएमसीने (BMC) अभिनेत्री कंगना रनौतच्या (Kangana Ranaut) बांद्रा येथील घरावर कारवाई केली होती. हा वाद शिगेला पोहचला असताना कंगनाच्या खार येथील घरावरही (Kangana Ranaut Khar Residence) हातोडा पडेल अशी शंका व्यक्त केली जात होती. आता मुंबईच्या एका कोर्टाने म्हटले आहे की, अभिनेत्री कंगना रनौतने खार येथील निवासस्थान बनविताना मंजूर आराखड्याचे उल्लंघन केले आहे. महानगरपालिकेच्या कारवाईतून अंतरिम दिलासा मिळावी अशी मागणी करणार्‍या अभिनेत्रीची याचिका कोर्टाने फेटाळून लावली. हिंदुस्तान टाईम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, बीएमसीने बजावलेल्या नोटीसविरोधात कंगना रनौतने दिवाणी न्यायालयात याचिका दाखल केली होती.

बीएमसीने जारी केलेल्या नोटीसमध्ये असे म्हटले होते की, कंगनाने घरात केलेली बेकायदा बांधकाम हटविली जावीत. त्याशिवाय तिने तीन सदनिका एका युनिटमध्ये रुपांतरित करण्याचा संदर्भही बीएमसीकडून देण्यात आला आहे. बीएमसीने म्हटले होते की, कंगनाने तीन फ्लॅट्स तोडून त्याचे एक युनिटमध्ये रूपांतर करून नियमांचे उल्लंघन केले. आता कोर्टाने बीएमसीचे म्हणणे योग्य म्हणून ते मान्य केले आहे. कंगनाचे वकील रिझवान सिद्दीकी यांनी कोर्टात सांगितले की, बीएमसीने दिलेल्या नोटिसांमध्ये कंगनाने उल्लंघन केलेल्या गोष्टींचा स्पष्ट उल्लेख नव्हता. (हेही वाचा: अभिनेत्री कंगना रनौत ने बहिण रंगोली सोबत घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन, पहा हिरव्या रंगाच्या साडीतील मराठमोळा अंदाज)

बीएमसीचे वकील धर्मेश व्यास म्हणाले, ‘नोटीस बजावण्यापूर्वी एका अभियंत्याने बीएमसीच्या वतीने कंगनाच्या घराचे सर्वेक्षण केले व या अभियंत्याने 8 उल्लंघनांचा उल्लेख केला.’ एमआरटीपी कायद्याच्या कलम 53(1) अन्वये बीएमसीने एच / वेस्ट प्रभागातील सक्षम अधिकाऱ्यांने मंजूर केलेले आदेश मे, सप्टेंबर आणि डिसेंबरमध्ये दिले होते. ज्यामध्ये कंगनाच्या खार पश्चिम येथील ऑर्किड ब्रीझ इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील घरात केले गेलेले बदल हटविण्याचे आदेश दिले होते.