Urmila Matondkar Birthday: पहिल्या चित्रपटापासून लव स्टोरी पर्यंत 'रंगीला गर्ल' उर्मिला मातोंडकर यांच्याविषयी खास गोष्टी जाणून घ्या
Urmila Matondkar (PC - File Photo)

Urmila Matondkar Birthday: 'रंगीला गर्ल' म्हणून प्रसिद्ध असलेल्या उर्मिला मातोंडकर 4 फेब्रुवारी रोजी आपला वाढदिवस साजरा करत आहे. उर्मिला मातोंडकर हिने हिंदी चित्रपटांसोबतच मराठी, तेलगू, तामिळ आणि मल्याळम चित्रपटांमध्येही काम केलं आहे. चित्रपटांसोबतचं उर्मिला मातोंडकर तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे बर्‍याचदा चर्चेत राहिली होती. आज या खास प्रसंगी आम्ही तुम्हाला अभिनेत्रीच्या आयुष्याशी संबंधित काही गोष्टी सांगणार आहोत.

उर्मिला मातोंडकर यांनी 1980 मध्ये मराठी 'झाकोल' या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. कलयुग (1981) हा त्यांचा पहिला बॉलिवूड चित्रपट होता. तथापि, उर्मिला मातोंडकर यांना 1983 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मासूम’ या चित्रपटातून ओळख मिळाली. यानंतरही उर्मिला मातोंडकरने बालकलाकार म्हणून अनेक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. (वाचा - Urmila Matondkar Joins Shiv Sena: अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांंचा 'मातोश्री' वर शिवसेना पक्षामध्ये प्रवेश)

बालकलाकारानंतर उर्मिला मातोंडकर Chanakyan (1989) चित्रपटात प्रथमचं मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसली. त्याचवेळी उर्मिलाला 1991 मध्ये ‘नरसिम्हा’ चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत मान्यता मिळाली. त्याचबरोबर मुख्य अभिनेत्री म्हणून ती पहिल्यांदा 1992 मध्ये 'चमत्कार' चित्रपटात दिसली. यानंतर, उर्मिलाने बॉलिवूडला बरीच हिट चित्रपट दिले. ज्यात रंगीला, जुदाई, सत्या, कौन, प्यार तूने क्या किया, भूत आणि एक हसीना थी आदी चित्रपटाचा समावेश आहे. 1995 मध्ये रंगीला या चित्रपटासाठी उर्मिलाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता. तसेच पिंजर, नैना, मैंने गांधी को नहीं मारा, बस एक पल आदी चित्रपटातून उर्मिलाने प्रेक्षकांची मने जिंकली.

दरम्यान, 2016 मध्ये उर्मिलाने मोहसीन अख्तर मीरशी लग्न केले. उर्मिलाने तिचे लग्न गुपचूप ठेवले. मोहसीन उर्मिलापेक्षा 10 वर्षांनी लहान आहे. मीडिया रिपोर्टनुसार, उर्मिला आणि मोहसीन यांची भेट मनीष मल्होत्रा ​​यांच्यामार्फत झाली. मोहसीन अख्तर मीर हा काश्मीरचा व्यापारी आणि मॉडेल आहे. त्याचा कपड्यांचा व्यवसाय आहे. इतकेचं नाही तर त्याने झोया अख्तरच्या ‘लक बाय चान्स’ या चित्रपटातही काम केले आहे.

मोहसीन आणि मनीष मल्होत्रा यांचे ​​आपापसांत चांगले बॉन्डिंग आहे. 2007 च्या मिस्टर इंडिया स्पर्धेमध्ये मोहसिन दुसरा उपविजेता ठरला आहे. इतकेचं नाही तर मोहसिनने मनीष मल्होत्राच्या बर्‍याच शोमध्ये मॉडेलिंग केली आहे. एकेकाळी उर्मिलाचे नाव दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्याशीही जोडले गेले होते. तथापि, याबद्दल अद्याप कोणतेही अधिकृत विधान करण्यात आलं नाही.