महाराष्ट्राच्या गृह विभागाने सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) आणि त्याचे वडील सलीम खान यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे. खान कुटुंबीयांकडून त्यांना धमकीचे पत्र प्राप्त झाल्याची तक्रार मिळताच मुंबई पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे. आज पोलीस सलमान खानच्या घरी पोहोचले होते. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. 5 जून म्हणजेच काल, सलमान खान आणि त्याच्या वडिलांना धमकी देणारे पत्र आले होते, ज्यामध्ये त्यांना ठार मारण्याची धमकी दिली होती. यामुळे मुंबई पोलिसांनी अभिनेता आणि त्याच्या वडिलांची सुरक्षा आणखी कडक केली आहे.
मुंबई पोलीस प्रमुख संजय पांडे (Sanjay Pandey) यांनी अभिनेता सलमान खानला दिलेल्या धमकीच्या पत्रावर बोलताना या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली जात असल्याचे सांगितले. मुंबई पोलीस प्रमुख म्हणाले, ‘आम्ही त्यांना मिळालेल्या पत्राची आणि संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहोत, अद्याप कोणालाही ताब्यात घेतलेले नाही. गरज भासल्यास आम्ही त्यांची अजून सुरक्षा वाढवू. मुंबई पोलीस हे प्रकरण गांभीर्याने हाताळत आहेत.’ शहर पोलिसांनी आज वांद्रे येथील सलमान खानच्या निवासस्थानी भेट दिली आणि परिसराच्या सभोवतालची सुरक्षा वाढवली.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी प्रख्यात लेखक सलीम खान मॉर्निंग वॉकनंतर वांद्रे बँडस्टँडवर एका बाकावर बसले होते, तेव्हा एका अज्ञात व्यक्तीने तेथे एक पत्र ठेवले होते ज्यात त्यांना आणि त्यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. नंतर, त्यांच्या सुरक्षा कर्मचार्यांच्या मदतीने, सलीम खान यांनी पोलिसांशी संपर्क साधला आणि वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड संहितेच्या कलम 506-II (गुन्हेगारी धमकी) अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला.
आज, मुंबई गुन्हे शाखेच्या पाच अधिकार्यांनी स्थानिक पोलीस कर्मचार्यांसह खान यांच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमधील निवासस्थानी भेट दिली आणि त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला. या पत्राची गंभीर दखल घेऊन, पोलीस त्या भागात बसवलेल्या विविध सीसीटीव्हीचे फुटेज स्कॅन करत आहेत, जेणेकरून त्या बाकावर ती नोट कोणी ठेवली हे समजू शकेल. (हेही वाचा: मूसेवाला हत्या प्रकरणाचा तपास CBI कडे सोपवण्याची मागणी; भाजप नेत्याने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली याचिका)
दुसरीकडे, सलमान खानला मिळालेल्या धमकीच्या पत्रासंदर्भात लॉरेन्स बिश्नोईची चौकशी करण्यात आली असून त्याला अनेक प्रश्न विचारण्यात आले आहेत. सध्या लॉरेन्स बिश्नोई हा स्पेशल सेलच्या ताब्यात असून त्याची चौकशी सुरू आहे. मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमान खानला मिळालेल्या धमकीच्या पत्रात शेवटी GB आणि LB अशी अक्षरे आहेत. याचा अर्थ गोल्डी ब्रार आणि लॉरेन्स बिश्नोई असा होऊ शकतो. मात्र हे पत्र खरोखरच बिष्णोई टोळीशी संबंधित आहे की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.